
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रय भरणे यांना निवेदन
पुणे : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक निःपक्षपातीपणे लवकरात लवकर घेतली जावी यासाठी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव व उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर संघटनेचे उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सुर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे खजिनदार अमोल सोनवणे व इंदापूर तालुका बॉक्सिंग संघटनेचे प्रतिनिधी राजू जठार यांच्या शिष्टमंडळाने उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर येथे भेट घेतली व त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची कार्यकारिणीची मुदत २९ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. राज्य संघटनेची कार्यकारिणी अस्तित्वात नसल्यामुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी राज्यात नेमण्यात आलेल्या समितीतर्फे निवड चाचणी घेऊन महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धांना पाठविला जातो. परंतु गेली दोन वर्षे राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजना अभावी खेळाडूंना शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या
५ टक्के आरक्षण, वाढीव गुण अशा कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे राज्यातील बॉक्सिंग खेळाडूंचे फार मोठ्या प्रमाणात न भरून येणारे नुकसान झाले आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या कारभाराकरिता अस्थाई समिती स्थापन केली आहे, जेणेकरून किमान यापुढे तरी महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडूंना ५ टक्के आरक्षण, वाढीव गुण असे लाभ मिळतील, तसेच लवकरात लवकर महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे निवडणूक घेतली जाईल.
गेली दोन वर्षापेक्षा जास्त काळ फक्त बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अडथळ्यामुळे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे निवडणूक होऊ शकली नाही. आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीची मुदत २ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात आली आहे व त्यामुळे त्यांचे पदाधिकारी घटनेतील तरतुदीनुसार कोणताही कारभार करू शकत नाहीत व अशा परिस्थितीत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडूंच्या भल्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्याशी तातडीने चर्चा विनिमय करून महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक निःपक्षपातीपणे लवकरात लवकर घेण्यात यावी याकरिता पुढाकार घ्यावा, अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव व उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी केली.
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व बाबींची नोंद घेतली व तातडीने याबाबत उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले.