
जळगाव : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार शिव जयंती निमित्त बुधवारी (१९ फेब्रुवारी) ‘जय शिवराय-जय भारत’ पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र जळगाव, मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, जळगाव नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांची उपस्थिती होती.
या बैठकीत आयोजनाबाबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले. क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी आभार मानले.