
सी के नायडू ट्रॉफी : विकी ओस्तवालची प्रभावी कामगिरी
पुणे : सी के नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विकी ओस्तवालच्या (५-६३) प्रभावी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने मुंबई संघाला पहिल्या डावात २४२ धावांवर रोखले. मात्र, महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्र संघाने १४ षटकात दोन बाद ३२ धावा काढल्या आहेत. महाराष्ट्र संघ अद्याप २१० धावांनी पिछाडीवर आहे.
विकी ओस्तवालच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मुंबईचा पहिला डाव २४२ धावांत गडगडला. विकी ओस्तवाल याने ६३ धावांत पाच विकेट घेऊन ७० षटकांच्या खेळात मुंबई संघाला २४२ धावांवर रोखण्यात यश मिळवले. मुंबई संघाकडून वेदांत मुरकर याने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. वेदांत याने १३१ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची चिवट खेळी करत डाव सावरला. त्याने एक षटकार व बारा चौकार मारले. आर्यन पटणी (२१), मनन भट्ट (१४), प्रज्ञेश कानपिल्लेवार (२७), आयुष सत्यवर्तक (३८) यांनी आपले योगदान दिले. अंगकृष्ण रघुवंशी (५), हिमांशू सिंग (२), धनित राऊत (६), राजेश सरदार (९) हे स्वस्तात बाद झाले.
महाराष्ट्र संघाचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला तो विकी ओस्तवाल. विकी याने २४ षटके गोलंदाजी करत ६३ धावांत पाच विकेट घेत आपला ठसा उमटवला. राजवर्धन हंगरगेकर याने ५२ धावांत दोन गडी बाद केले. अजय बोरुडे (१-२१), क्षितिज पाटील (१-४८) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
मुंबई संघाला २४२ धावसंख्येवर रोखण्याचा आनंद महाराष्ट्र संघाला फार काळ घेता आला नाही. महाराष्ट्र संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. कर्णधार अनिकेत नलावडे अवघ्या चार धावांवर बाद झाला. धनित राऊत याने त्याला बाद केले. त्यानंतर धनित राऊत याने आक्रमक फलंदाज सचिन धस याला ५ धावांवर बाद करुन महाराष्ट्र संघाला दुसरा धक्का दिला. १४ षटकांच्या खेळात महाराष्ट्र संघाने दोन बाद ३२ धावा काढल्या आहेत. त्यावेळी अनिरुद्ध साबळे (१२) व हर्षल काटे (११) ही जोडी खेळत होती. महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी अद्याप २१० धावांची गरज आहे.