
नॅट सायव्हर ब्रंटची अष्टपैलू कामगिरी
वडोदरा : मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स संघाचा पाच विकेट राखून पराभव करत महिला प्रीमियर लीग स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. नॅट सायव्हर-ब्रंटची (५९ धावा आणि दोन बळी) अष्टपैलू कामगिरी मुंबईच्या विजयात महत्त्वाची ठरली.
यास्तिका भाटिया (८) लवकर बाद झाली. त्यानंतर हेली मॅथ्यूज (१७) व नॅट सायव्हर ब्रंट या जोडीने आक्रमक फलंदाजी करत संघाचा विजय सुकर बनवला. हरमनप्रीत कौर अवघ्या चार धावांवर बाद झाली. अमेलिया केर १९ धावांवर तंबूत परतली. नॅट सायव्हर ब्रंट हिने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. तिने ३९ चेंडूत ५९ धावा फटकावत संघाचा विजय निश्चित केला. तिने धमाकेदार खेळीत ११ चौकार मारले. सजीवन संजना (नाबाद १०), कमालिनी (नाबाद ४) यांनी संघाच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संजनाने विजयी चौकार ठोकत १६.१ षटकात १२२ धावांसह संघाला विजय मिळवून दिला. प्रिया मिश्रा (२-४०) व काशवी गौतम (२-१५) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
गुजरात सर्वबाद १२०
मुंबई इंडियन्सच्या घातक गोलंदाजीसमोर गुजरात जायंट्स संघ २० षटकात अवघ्या १२० धावसंख्येत सर्वबाद झाला. त्यांच्या सहा फलंदाजांना दुहेरी अंकही गाठता आला नाही. गुजरातकडून हरलीन देओलने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय काशवी गौतमने २०, तनुजा कंवरने १३, सायली सातघरेने नाबाद १३ आणि गार्डनरने १० धावा केल्या. दरम्यान, मुंबईकडून हेली मॅथ्यूज हिने (३-१६) तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय नॅट सिव्हर ब्रंट (२-२६) आणि अमेलिया केर (२-२२) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शबनम इस्माइल (१-१७) आणि अमनजोत कौर (१-१७) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.