खुल्या जलाशयात पोहण्याचे मोफत मार्गदर्शन शिबीर

  • By admin
  • February 19, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजेश भोसले यांचा अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म महोत्सवानिमित्त तरुणांसाठी खुल्या जलाशयात पोहण्याचे मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश भोसले यांनी या अभिनव उपक्रम आयोजित केला आहे.

या उपक्रमाविषयी माहिती सांगताना राजेश भोसले म्हणाले की, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी अडीच ते तीन लाख लोक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडतात. कारण अधिकांश लोकांना खुल्या जलस्त्रोतांची संपूर्ण माहितीच नाही. म्हणूनच जास्तीत जास्त अपघात होतात. त्यातल्या त्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण भारतात जास्त आहे. विशेष म्हणजे यामध्ये ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांची संख्या आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. जे जीव आपण जलतरण साक्षरता करून वाचवू शकतो. प्रत्येक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत आपण जर खुल्या जलाशयांची माहिती पोहोचवली तर अपघातांची संख्या कमी होऊ शकते. म्हणूनच या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.’

जलस्त्रोतांची पूर्ण माहिती, मार्गदर्शन, समुदेशन, शिक्षण आणि प्रशिक्षण नसेल तर आपला जीव धोक्यात घाऊ नये. खुल्या जलस्त्रोतांची माहिती नसताना पोहणे हे अतिशय धोकादायक असते. याविषयी जनजागृती व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण व सामान्य नागरिकांसाठी खुल्या जलाशयात पोहण्याचे मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवतीर्थ निवासी क्रीडा संकुल, हर्सुल तलाव, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे १९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश भोसले यांनी दिली.

राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन
राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन २०२५ नुसार ‘आवाज दो’ म्हणजे जलतरणाची इच्छा असणाऱ्या सर्व शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांना व सामान्य नागरिकांना जलतरण पूर्वी म्हणजेच तरणा पूर्वी जल व जल स्त्रोतांची म्हणजे विहिर, आड, बारव, नदी, नाले, ओढे, डोह, बंधारे, चारी, पाट, खदाण, कट्टा, तळे, शेततळे, सिंचन प्रकल्प, तलाव, सरोवर, धबधबा, खाडी, समुद्र इत्यादी नैसर्गिक जलस्त्रोत व कृत्रिम जलसाठे याविषयी अवगत करून देणे. त्यांची उपयोगिता व धोके लक्षात आणून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे राजेश भोसले यांनी सांगितले.

राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन २०२५ च्या वतीने मोफत जलतरण साक्षरता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपल्या नावाची नोंदणी 95279 24646 या व्हॉट्सअप क्रमांकावर करावी. जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण व सामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले, गोपालकृष्ण नवले, शाम खोसरे, विजयसिंग बारवाल, विश्वास शेळके, गणेश गायकवाड, एन आर पवार, गजानन गायके, शंकर ताकवाले पाटील, भीमराव वाठोरे, विजय भोसले, अनिल देशमुख, गोरख नजन, अरविंद तुपे, संदीप पाथ्रीकर, विजय दारुंटे, कृष्णा शिंदे, संदीॉप माघाडे, अनिल चव्हाण, किरण बोरसे, प्रमुल पाटील यांनी केले आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे राजेश भोसले यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *