
अंतिम सामन्यात उल्हासनगरच्या डिवाइन अकादमीवर विजय
ठाणे : अरविंद धाक्रस स्मृती लिटील चॅम्प्स टी २० करंडक क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय (ठाणे) या संघाने विजेतेपद पटकावले.
आधारवाडी येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुप अ स्पर्धेचा अंतिम सामना डिवाइन क्रिकेट अकादमी उल्हासनगर आणि श्री माँ विद्यालय ठाणे यांच्यात झाला. नाणेफेक जिंकून डिवाइन क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात ८५ धावा काढल्या. कार्तिक देवेंद्र (२६), निवेध लखानी (२०), मुजाहित अन्सारी (२२) यांनी सुरेख फलंदाजी केली. आदित्य राज सिंग याने २२ धावांत तीन गडी बाद केले. युवान जैन याने १७ धावांत तीन विकेट घेतल्या.
श्री माँ विद्यालय ठाणे संघाने १९.४ षटकात ८५ धावा फटकावत विजेतेपद पटकावले. कनिश दळवी (२०), विवान एम (२३), ध्रुव सोनार (१८) यांनी दमदार फलंदाजी केली. असीम पाटील याने १८ धावांत एक गडी बाद केला. ह्रदान पाटील याने १९ धावांत दोन बळी घेतले.
युवान जैन याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीचे सचिव संतोष पाठक, डिवाइन क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक रवी चौरसिया, श्री माँ विद्यालयाचे प्रशिक्षक अजय यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक परेश हिंदुराव, विनायक राऊळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.