
मुंबई : मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे बुधवारी (१९ फेब्रुवारी) ह्रदयविकाराने निधन झाले. किडनी निकामी झाल्यामुळे वयाच्या ७६व्या वर्षी मिलिंद रेगे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मिलिंद रेगे यांचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव होते. सुनील गावसकर यांचे ते जवळचे मित्र होते. दोघेही मुंबई क्रिकेट संघातून खेळले आहेत. मिलिंद रेगे यांना वयाच्या २६व्या वर्षी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना क्रिकेट सोडावे लागले. क्रिकेट सोडल्यानंतरही मिलिंद रेगे हे क्रिकेटशी जोडले गेले. मुंबई क्रिकेट असोसिएशनची सेवा त्यांनी अनेक वर्षे केली. मिलिंद रेगे हे जवळपास तीन दशके मुंबई क्रिकेटचे निवडकर्ता म्हणून कार्यरत होते. वयाच्या ७६व्या वर्षी देखील ते क्रिकेट सल्लागार म्हणून आपली सेवा देत होते.
मिलिंद रेगे यांची कारकीर्द
मिलिंद रेगे हे १९६७ ते १९७९ या कालावधीत मुंबई क्रिकेट संघाकडून खेळले. मिलिंद रेगे हे गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. ते उजव्या हाताने फलंदाजी करायचे व उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. मिलिंद रेगे यांनी काही सामन्यांत मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व देखील केले आहे. पश्चिम विभाग संघाकडून देखील ते खेळले आहेत.
१९८० पासून मुंबई निवड समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. २०११ मध्ये त्यांची निवड समितीचे मुख्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वर्षभरातच त्यांनी राजीनामा दिला. २०१५ मध्ये मिलिंद रेगे हे पुन्हा निवड समितीचे मुख्य बनले.
मिलिंद रेगे यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ५२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी १२६ विकेट घेतल्या आहेत. ८४ धावांत सहा विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्यांनी पाच विकेट घेण्याचा पराक्रम तीनदा केला आहे. तसेच ५२ सामन्यांत त्यांनी ७० डावांत १५३२ धावा केल्या आहेत.
मिलिंद रेगे हे मुंबई क्रिकेट संघाच्या निवडीचा एक भाग होते. त्यांच्या काळात सचिन तेंडुलकर याने १९८८-८९ हंगामात रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.