
नागपूरच्या एक्वा स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी
नागपूर : नागपूर शहरातील एक्वा स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी मुंबई येथे झालेल्या ६१व्या राज्यस्तरीय संक रॉक लाइट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया ओपन सी स्विमिंग शर्यतीत विविध वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करून नागपूर शहराचा नावलौकिक वाढवला. ही वार्षिक सागरी जलतरण स्पर्धा महाराष्ट्र राज्य ॲक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील राज्यातून हजाराहून अधिक जलतरणपटूंनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग घेतला. ॲक्वा स्पोर्ट्स क्लबच्या संजना जोशी हिला शर्यतीतील सर्वात वेगवान महिला जलतरणपटू ट्रॉफीने गौरविण्यात आले.संजनाने या स्पर्धेत विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ४५ मिनिटे लागली. मुलींच्या गटात ५ किलोमीटर शर्यतीत नागपूरचे प्रतिनिधित्व करताना संजनाने प्रथम स्थान पटकावले आणि शर्यतीतील सर्वात जलद महिला विजेतेपद बहुमान मिळवला आहे.
पुरुष गटात ५ किलोमीटर शर्यतीत अपूर्व गोरले याने ४९ मिनिटांच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावले. महिला गटात ५ किलोमीटर शर्यतीत उर्मित पटेलने ५३ मिनिटांच्या वेळेसह सहावे स्थान पटकावले. मुलांचा गट १ किलोमीटर स्पर्धेत दिव्यांग जलतरणपटू अक्षय नवले याने १७ मिनिटांच्या वेळेसह चौथा क्रमांक पटकावला. पुरुष गटात हितेंद्र जुनागडे याने निर्धारित वेळेत शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली.
सर्व जलतरणपटू हे ॲक्वा स्पोर्ट्स क्लबचे नियमित सदस्य आहेत आणि वरिष्ठ प्रशिक्षक डॉ. प्रवीण लामखडे, विशाल चांदूरकर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
ॲक्वा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोहन नाहटकर, सचिव मंगेश गद्रे, मिडलँड स्पोर्ट्सचे संचालक प्रशांत उगेमुगे, उपाध्यक्ष ऑपरेशन्स मिडलँड स्पोर्ट्स प्रीती लांजेकर, मॅनेजर ऑपरेशन्स मिडलँड स्पोर्ट्सचे अश्विन जनबंधू, ॲक्वा स्पोर्ट्स क्लबचे पालक जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमींनी शहराच्या कानाकोपऱ्यातून या जलतरणपटूंच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.