
लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक, खेळाडू, विद्यार्थी यांचा मोठा सहभाग
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात भव्य जिल्हास्तरीय ‘जय शिवराय, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या पदयात्रेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. इतिहास, परंपरा आणि राष्ट्रभक्ती यांचा अभूतपूर्व संगम या पदयात्रेत दिसून आला. या पदयात्रेचा प्रारंभ श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ९ वाजता झाला. या प्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, सचिव राम पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संविधान उद्देशिका वाचन आणि पदयात्रेची सुरुवात झाली. खासदार स्मिता वाघ यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. प्रसिद्ध शाहीर ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यगीत सादर केले. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथून पदयात्रेला भव्य सुरुवात झाली.
पदयात्रेतील विशेष आकर्षण
शिवरायांचा रथ हा पदयात्रेत आकर्षणाचा केंद्र ठरला. आकर्षक सजविलेल्या रथावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान केलेले बालकलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या मर्दाणी शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अनिता पाटील आणि चंचल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड आणि विविध योगासने सादर केली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. ढोल-ताशा आणि लेझीम पथक विद्यार्थ्यांनी सादर केलेले ढोल-ताशा आणि लेझीम पथक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.
विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग
शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि क्रीडापटू यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
पदयात्रेचा मार्ग आणि ऐतिहासिक स्थळांना अभिवादन
पंडीत जवाहरलाल नेहरू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पदयात्रा चित्रा टॉकीज मार्गे शिवतीर्थावर पोहोचली, जिथे शिवरायांची आरती करून समारोप करण्यात आला.
सहभागी नागरिकांसाठी दूध, पाणी, केळी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली. शिवरायांचा इतिहास जपणारी आणि नव्या पिढीला प्रेरणादायी ठरलेली अभूतपूर्व पदयात्रा जळगाव शहरात आज चर्चेचा विषय बनली होती.