
विकी ओस्तवालची प्रभावी कामगिरी, मुंबईची १७३ धावांची आघाडी
पुणे : डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या सी के नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मुंबई संघाने महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात १६५ धावांवर रोखून सामन्यावर आपली पकड भक्कम केली आहे. मुंबई संघाने दुसऱ्या डावात चार बाद ९६ धावा फटकावत आघाडी १७३ धावांची केली आहे.
मुंबई संघाचा पहिला डाव ७० षटकात २४२ धावांवर संपुष्टात आला. त्यात वेदांत मुरकर याने सर्वाधिक ७९ धावा काढल्या. आयुष वर्तक याने ३८ धावांचे योगदान दिले. सूर्यांश शेडगे याने २७ धावा फटकावल्या. महाराष्ट्र संघाकडून विकी ओस्तवाल याने प्रभावी गोलंदाजी करत ६३ धावांत पाच विकेट घेतल्या.
महाराष्ट्र संघाचा पहिला डाव ६२.४ षटकात १६५ धावांत गडगडला. अनिरुद्ध साबळे याने १४१ चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले. त्याने चार चौकारांसह ५० धावा केल्या. हर्षल काटे याने ७२ चेंडूत ४६ धावांची संयमी खेळी केली. त्याने सहा चौकार मारले. अजय बोरुडे याने २६ धावांचे योगदान देताना एक षटकार व दोन चौकार मारले. अन्य फलंदाज स्वस्तात बाद झाले. मुंबई संघाकडून हिमांशू सिंग याने ५५ धावांत पाच विकेट घेत संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. धनित राऊत याने ४१ धावांत तीन बळी घेतले.
पहिल्या डावात ७७ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबई संघाने दुसऱ्या डावात ३६ षटकांच्या खेळात चार बाद ९६ धावा काढल्या आहेत. त्यामुळे मुंबई संघाची आघाडी १७३ धावांची झाली आहे. मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. अंगकृष्ण रघुवंशी (१२), आर्यन पटणी (१२), मनन भट्ट (२), प्रज्ञेश कानपिल्लेवार (४) हे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. वेदांत मुरकर (नाबाद २२) व आयुष वर्तक (नाबाद ३८) यांनी डाव सावरला.
महाराष्ट्र संघाकडून विकी ओस्तवाल याने २२ धावांत तीन विकेट घेत दुसऱ्या डावातही आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. शुभम मैड याने २० धावांत एक गडी बाद केला.