
विल यंग, टॉम लॅथमची धमाकेदार शतके, न्यूझीलंड ६० धावांनी विजयी
कराची : विल यंग (११७) आणि टॉम लॅथम (११८) यांच्या शानदार शतकांच्या बळावर न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गतविजेत्या पाकिस्तान संघाला पराभवाचा धक्का दिला. यजमान पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
पाकिस्तान संघासमोर विजयासाठी ३२१ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावाची सुरुवात बजावली. सौद शकील (६), कर्णधार मोहम्मद रिझवान (३) हे लवकर बाद झाले. फखर झमान ४१ चेंडूत २४ धावा काढून क्लीन बोल्ड झाला. त्याने चार चौकार मारले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी ठरत असल्याने पाकिस्तान संघाच्या आक्रमक फलंदाजांना फटकेबाजी करणे सहज शक्य होत नव्हते. साहजिकच धावगती षटकामागे वाढत गेली. त्याचा दबाव पाकिस्तान संघावर वाढत गेला.

अनुभवी बाबर आझम व सलमान आगा या जोडीने डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. सलमान २८ चेंडूत ४२ धावा काढून तंबूत परतला. त्याने सहा चौकार मारले. तैयब ताहिर (१) लगेच बाद झाला. त्यानंतर बाबर आझम याने धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बाबर आझम ९० चेंडूत ६४ धावांची खेळी करुन बाद झाला. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. बाबरची संथ खेळी चर्चेचा विषय बनली. बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची स्थिती सहा बाद १५३ अशी बिकट झाली होती. खुशदील शाह याने ४९ चेंडूत ६९ धावांची बहारदार खेळी केली. या आक्रमक खेळीत त्याने एक षटकार व दहा चौकार ठोकले. खुशदील बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आशा संपुष्टात आल्या. शाहीन आफ्रिदी (१४), हरिस रऊफ (१९) यांनी आपले योगदान दिले. हरिस याने तीन उत्तुंग षटकार ठोकले. हेन्री याने नसीमला (१३) क्लीनबोल्ड करुन संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानचा डाव ४७.२ षटकात २६० धावांवर संपुष्टात आला.
न्यूझीलंड संघाकडून विल्यम ओरोर्के याने ४७ धावांत तीन विकेट घेतल्या. मिचेल सँटनर याने तीन विकेटसाठी ६६ धावा मोजल्या. मॅट हेन्री याने २५ धावांत दोन गडी बाद केले. मायकेल ब्रेसवेल (१-३८) व नॅथन स्मिथ (१-२०) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
न्यूझीलंड पाच बाद ३२०
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना कराची येथे खेळला गेला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ५० षटकात पाच बाद ३२० धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. सलामीवीर विल यंग (११७) आणि टॉम लॅथम (११८) यांनी शतके झळकावली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवात नक्कीच चांगली केली होती. पण मधल्या फळीत विल यंग आणि टॉम लॅथम यांनी त्यांच्या संघाला पुनरागमन मिळवून दिले. शेवटच्या षटकांमध्येही पाकिस्तानचे गोलंदाज थकलेले दिसत होते आणि त्यांना चांगलाच फटका बसला. पाकिस्तानी गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला संपूर्ण सामन्यात एकही विकेट घेता आली नाही.
खराब सुरुवातीनंतर, विल यंगने जबाबदारी घेतली आणि शतक ठोकले. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे बाद झाल्यानंतर, पुढच्याच षटकात केन विल्यमसन १ धाव करून बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची फलंदाजी निश्चितच डळमळीत झाली. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अबरार अहमदने कॉनवे (१०) ला बाद केले. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, केन विल्यमसन १ धाव घेत नसीम शाहचा बळी ठरला.
चौथ्या क्रमांकावर आलेला डॅरिल मिशेलही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, १७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो हॅरिस रौफच्या हाती झेलबाद झाला. तथापि, दुसऱ्या टोकाला, सलामीवीर विल यंगने ठाम राहून एक महत्त्वाचे शतक झळकावले. विल यंगने ११३ चेंडूत १०७ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १ षटकार आणि १२ चौकार होते.
टॉम लॅथमच्या शतकामुळे न्यूझीलंडने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. ग्लेन फिलिप्सने शेवटच्या षटकांमध्ये धमाकेदार खेळी केली. यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमने शेवटच्या षटकांमध्ये चांगले शॉट्स खेळले आणि ९५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. लॅथमने १०४ चेंडूत नाबाद ११८ धावा केल्या. या डावात त्याने ३ षटकार आणि १० चौकार मारले. स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने शेवटच्या षटकांमध्ये टॉम लॅथमला चांगली साथ दिली आणि स्फोटक पद्धतीने धावा काढल्या. फिलिप्सने ३९ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
शाहीन आफ्रिदी गोलंदाजीत फ्लॉप
यजमान पाकिस्तान संघाचा सर्वात मोठा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पहिल्या सामन्यात आपल्या विकेटचे खाते उघडू शकला नाही. त्याने १० षटकांत ६.८० च्या इकॉनॉमीने ६८ धावा दिल्या. नसीम शाहने १० षटकांत ६३ धावा देत २ बळी घेतले. हरिस रौफने त्याच्या १० षटकांच्या स्पेलमध्ये २ बळी घेतले पण तो महागडा ठरला कारण त्याने ८.३० च्या इकॉनॉमीने ८३ धावा दिल्या. अबरार अहमद सर्वात किफायतशीर गोलंदाज होता, त्याने १० षटकांत ४७ धावा देत १ बळी घेतला.