
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नानावटी हॉस्पिटल संघाने बलाढ्य केडीए हॉस्पिटल संघाला ३ विकेटने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू फरहान काझी, प्रणव हरियान, किशोर कुयेस्कर आणि दिनेश पवार यांचा आक्रमक खेळ नानावटी हॉस्पिटल संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरला.
केडीए हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीवीर अल्केत तांडेल (७७ धावा) आणि प्रथमेश महाडिक (३१ धावा) यांच्या धडाकेबाज खेळामुळे केडीए हॉस्पिटलने २० षटकांत ८ बाद १३५ धावा केल्या. नानावटी हॉस्पिटल संघाच्या गोलंदाजांनी उत्तम प्रदर्शन करत केडीए संघाला जास्त धावा मिळवू दिल्या नाहीत. फरहान काझीने २६ धावांत २ विकेट घेतल्या.
विजयी धावांचा पाठलाग करताना नानावटी हॉस्पिटल संघाची कडक चाचणी घेतली. एकवेळ नानावटी हॉस्पिटल संघाची अवस्था ५ बाद ६० धावा अशी बिकट होती. परंतु, प्रणव हरियान (३३ धावा), किशोर कुयेस्कर (२५ धावा), दिनेश पवार (नाबाद २० धावा) आणि फरहान काझी (नाबाद १३ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीने अंतिम फेरीसाठी आवश्यक धावांचा पाठलाग यशस्वी केला. १९ व्या षटकात नानावटी हॉस्पिटल संघाने ७ बाद १३६ धावा फटकावून विजय मिळवला.