
इराणमध्ये भारतीय संघाने जिंकले पहिले सुवर्णपदक
केरमंशाह, इराण : आशियाई आइस स्टॉक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय आइस स्टॉक स्पोर्ट्स संघाने एक अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास रचला आहे. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत १३ आशियाई देशांमधील अव्वल खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करताना भारतीय संघाने अतुलनीय कौशल्य, रणनीती आणि दृढनिश्चय दाखवून आइस स्टॉक आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले.
प्रणव तारे, क्रांतीकुमार पाटील, महेश राठोड, धनजी अय्यर, प्रविंद्रसिंह चौधरी, श्रीकांत सोमासे आणि विनायक चोथे यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.
अक्षता विरकर, श्रेया गायकवाड आणि आरिज हसन यांचा समावेश असलेल्या भारतीय मिश्र संघाने मिक्स टीम स्पर्धेत रौप्य पदक जिंकण्यासाठी प्रशंसनीय लढत दिली.
हा ऐतिहासिक विजय भारतीय आइसस्टॉक स्पोर्ट आणि हिवाळी खेळांमध्ये एक नवीन युग सुरू करतो, कारण आइस स्टॉक स्पोर्टमध्ये भारतासाठी हे पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.