
नांदेड : राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचा संघ शनिवारी (२२ फेब्रुवारी) निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी निवड चाचणी शनिवारी आर्चरी स्कूल श्री गुरू गोबिंदसिंगजी स्टेडियम या ठिकाणी होणार आहे.
रत्नागिरी येथे २८ फेबुवारी ते २ मार्च दरम्यान राज्यस्तरीय १० वर्षांखालील, १३ वर्षांखालील व १५ वर्षांखालील मुले व मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा इंडियन, रिकर्व्ह व कम्पाउंड अशा प्रकारात होणार आहे.
जिल्हास्तरीय निवड चाचणी २२ फेबुवारी रोजी आर्चरी स्कूल श्री गुरू गोबिंदसिघजी स्टेडियम नादेंड येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. जिल्हा सचिव वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत धर्नुधरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटना कार्याध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केले आहे.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत रत्नागिरी धनुर्विद्या संघटनेच्या वतिने डेरवण येथे १५ वर्षांखालील मुले-मुली वयोगटात रिकर्व्ह व कम्पाऊंड प्रकारासाठी (४० मीटर) व इंडियनसाठी (३० मीटर), १३ वर्षांखालील वयोगट मुले-मुली रिकर्व्ह व कंम्पाऊड राऊंड (३० मीटर), इंडियन (२० मीटर), १० वर्षांखालील मुले-मुली रिकर्व्ह व कम्पाउंड (२० मीटर), इंडियन राऊंड (१५ मीटर) असणार असून १० व १३ वर्षे वयोगटात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत थेट सहभाग देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.