
कराची : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाचा धक्का बसला. आता आक्रमक फलंदाज फखर जमान हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ६० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आता, पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार फखर जमान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
फखर झमान हा न्यूझीलंडविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता. पाकिस्तानचा सलामीवीर फखर हा क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. मात्र, आता भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी फखर जमान याला वगळणे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तानच्या ‘ए स्पोर्ट्स’च्या मते फखर झमान स्पर्धेच्या आगामी सामन्यांमध्ये दिसणार नाही. याशिवाय तो पाकिस्तानी संघासोबत दुबईला जाणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाईल.
या दुखापतीनंतर फखर जमान सलामीला आला नाही. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पण धावा काढण्यास त्याला संघर्ष करावा लागला. परिणामी, फखर जमान ४१ चेंडूत २४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
तथापि, आता पाकिस्तानचा पुढचा सामना भारताविरुद्ध आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये एकमेकांसमोर येतील. यानंतर, पाकिस्तान आपला शेवटचा गट फेरीचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळेल. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना २७ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता पाकिस्तान संघ भारताविरुद्ध ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत आहे. त्यामुळे मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ भारताला हरवून स्पर्धेत आपल्या आशा जिवंत ठेवू इच्छितो.