
यश राठोडचे दमदार शतक
नागपूर : रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबई संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. विदर्भ संघाविरुद्ध खेळताना चौथ्या दिवसअखेर मुंबई संघाची स्थिती तीन बाद ८३ अशी बिकट झाली आहे. मुंबईला विजयासाठी ३२३ धावांची आवश्यकता आहे.
विदर्भ संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३८३ धावसंख्या उभारली. मुंबई संघाचा पहिला डाव २७० धावांवर रोखत विदर्भ संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले. त्यानंतर विदर्भ संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद २९२ धावसंख्या उभारुन मुंबई संघासमोर विजयासाठी ४०६ धावांचे आव्हान दिले. मुंबई संघाने दुसऱ्या डावात ३१ षटकांच्या खेळात तीन बाद ८३ धावा काढल्या आहेत.
यश राठोड याने २५२ चेंडूंचा सामना करत १५१ धावांची दमदार खेळी केली. यशच्या शतकामुळे विदर्भ संघ भक्कम स्थितीत पोहोचला. कर्णधार अक्षय वाडकर याने ५२ धावा फटकावत त्याला सुरेख साथ दिली. मुंबई संघाकडून शम्स मुलाणी याने ८५ धावांत सहा विकेट घेतल्या. तनुश कोटियन याने ८१ धावांत तीन बळी घेतले.
मुंबई संघाच्या आकाश आनंद व आयुष म्हात्रे या सलामी जोडीने २६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आयुष म्हात्रे (१८) व सिद्धेश लाड (२) हे बाद झाले.
कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, अजिंक्य दोन चौकारांसह १२ धावा काढून बाद झाला. पार्थ रेखाडे याने अजिंक्यला पायचीत बाद करुन मुंबईला मोठा धक्का दिला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्ह आकाश आनंद २७ तर शिवम दुबे १२ धावांवर खेळत होते. विदर्भ संघाच्या हर्ष दुबे याने २६ धावांत दोन बळी टिपले. पार्थ रेखाडे याने १६ धावांत एक बळी घेतला.