
जालना संघ सात बाद १६१
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत जालना संघाचा अष्टपैलू कर्णधार व्यंकटेश काणे याने ५७ धावांत सहा विकेट घेऊन पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला. व्यंकटेशच्या प्रभावी कामगिरीने साऊथ झोन संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर जालना संघाने ३७ षटकात सात बाद १६१ धावा काढल्या आहेत. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी जालना संघाला अद्याप ४९ धावांची आवश्यकता आहे.
बिडकीन येथील क्रिकेट मैदानावर हा सामना सुरू आहे. जालना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साऊथ झोन संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. त्यात विवेक अनाची याने सर्वाधिक ६३ धावांची सुरेख खेळी साकारली. राजवीर जगताप (२४), नेत्रदीप वैद्य (नाबाद १७), निखिल पाटील (३२), विवेक कवठेकर (१५) आणि पुष्कराज खराडे पाटील (१४) यांनी आपले योगदान दिले.
जालना संघाचा कर्णधार व्यंकटेश काणे याने ५७ धावांत सहा विकेट घेत सामना गाजवला. शोएब सय्यद याने ३८ धावांत तीन गडी बाद केले. रामेश्वर दौड (१-२६) याने एक बळी मिळवला.
जालना संघाने पहिल्या दिवसअखेर ३७ षटकांच्या खेळात सात बाद १६१ धावा काढल्या आहेत. त्यात आर्यन गोजे (२१), लक्ष बाबर (४७), कर्णधार व्यंकटेश काणे (३३), मेघ वडजे (नाबाद २०), रामेश्वर दौड (नाबाद १९) यांनी डाव सावरला.
साऊथ झोन संघाकडून दीप पंजा (२-३५), पुष्कराज खराडे पाटील (२-१८), श्री (२-२८) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.