
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सागर पवारच्या नाबाद २५१ धावांच्या बळावर छत्रपती संभाजीनगर संघाने ८८ षटकात नऊ बाद ३५२ धावसंख्या उभारली.
कटारिया हायस्कूल मैदानावर हा छत्रपती संभाजीनगर आणि पूना क्लब यांच्यात सामना होत आहे. पूना क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर संघाने ८८ षटके फलंदाजी करत नऊ बाद ३५२ धावा फटकावल्या. सलामीवीर सागर पवार याने नाबाद २५१ धावांच्या खेळी करत दिवसाचा खेळ गाजवला. सागर याने २६६ चेंडूंचा सामना करत आठ उत्तुंग षटकार व ३० चौकार ठोकले. स्वप्नील चव्हाण (१८), सूरज गोंड (३६), योगेश चव्हाण (१०), हर्षवर्धन पवार (नाबाद ११) यांनी आपले योगदान दिले.
डेक्कन जिमखाना संघाकडून धनराज परदेशी याने ६७ धावांत चार विकेट घेतल्या. सौरभ पवार याने ९७ धावांत तीन बळी घेतले. सूरज राय (१-५१) व शुभम कोठारी (१-८०) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.