
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
दुबई : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वी रोहितने त्याच्या कारकिर्दीत १०,९८८ धावा केल्या होत्या.
बांगलादेशविरुद्धच्या डावात फक्त १२ धावा करत रोहित शर्माने ११ हजार धावांचा टप्पा गाठला. आता अशी कामगिरी करणारा रोहित हा केवळ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात रोहितने ४१ धावांची खेळी साकारली.
रोहित शर्माच्या आधी फक्त तीन भारतीय फलंदाजांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत सर्वात आघाडीवर सचिन तेंडुलकर आहे, सचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या. तर विराट कोहलीने आतापर्यंत १३,९६३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर सौरव गांगुली आहे, ज्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ११,२२१ धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वात जलद ११ हजार धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सचिनने २७६ डावांमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु रोहितने त्याच्या कारकिर्दीतील २६१ व्या एकदिवसीय डावात ही कामगिरी केली आहे. आतापर्यंत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीने ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने २२२ डावांमध्ये हा पराक्रम पूर्ण केला. सचिन तेंडुलकरने २७६ डाव खेळले होते. रिकी पाँटिंगला २८६ डाव खेळावे लागले होते.
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ५०० धावाही पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी त्याने २०१३ आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळून एकूण ४८१ धावा केल्या होत्या. त्याने बांगलादेशविरुद्धच्या डावात १९ धावा करून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले ५०० धावा पूर्ण केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ४१ धावा काढल्यानंतर रोहित बाद झाला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या एकूण धावसंख्येची संख्या ५२२ झाली.