भारतीय संघाचा दणदणीत विजय

  • By admin
  • February 20, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

शुभमन गिलचे नाबाद शतक; बांगलादेश संघावर सहा विकेटने विजय 

दुबई : भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलच्या (नाबाद १०१) शतकाच्या बळावर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेश संघावर सहा गडी राखून विजय नोंदवला. या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांना आता येत्या रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्याचे वेध लागले आहेत. 

भारतीय संघासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान होते. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामी जोडीने ६९ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करून दिली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित ४१ धावांवर बाद झाला. रोहितने ३६ चेंडूंचा सामना करताना सात चौकार मारले. त्यानंतर अनुभवी फलंदाज विराट कोहली ३८ चेंडूत २२ धावा फटकावत बाद झाला. त्याने केवळ एक चौकार मारले. श्रेयस अय्यर देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून तंबूत परतला. त्याने दोन चौका मारले. अक्षर पटेल याने आठ धावांचे योगदान दिले. 

चार बाद १४४ अशा आव्हानात्मक स्थितीत केएल राहुल मैदानात उतरला. राहुलला ९ धावांवर जीवदान लाभले. त्यानंतर राहुल याने संयमाने फलंदाजी करत शुभमन गिल याला सुरेख साथ दिली. शुभमन व राहुल जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद ८७ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शुभमन गिल याने १२९ चेंडूंचा सामना करत नाबाद १०१ धावांची शानदार शतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना तसेच खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत असताना गिल याने संयमी फलंदाजी करत आयसीसी स्पर्धेत आपले पहिले शतक ठोकले. शतकी खेळी करताना गिल याने दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. राहुल याने ४७ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी करत संघ व्यवस्थापनाची चिंता दूर केली. राहुलने दोन षटकार व एक चौकार मारला. राहुलने षटकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ४६.३ षटकात चार बाद २३१ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला.

बांगलादेश संघाकडून रिशाद हुसेन याने ३८ धावांत दोन गडी बाद केले. तस्किन अहमद (१-३६), मुस्तफिजूर रहमान (१-६२) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. 

बांगलादेश सर्वबाद २२८

तौहीद हृदयॉय याचे शानदार शतक आणि झाकीर अलीच्या अर्धशतकाच्या मदतीने बांगलादेश संघाने भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर बांगलादेशची परिस्थिती एकेकाळी वाईट होती आणि त्यांनी फक्त ३५ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या होत्या. परंतु झाकीर आणि ह्रदयॉय यांनी एक शानदार भागीदारी करून बांगलादेशचा डाव वाचवला. या दोन डावांच्या मदतीने बांगलादेशला ४९.४ षटकांत २२८ धावा करता आल्या. ११८ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०० धावा काढल्यानंतर हृदयॉय पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारताकडून मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. शमीने सामन्यात पाच विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने तीन आणि फिरकीपटू अक्षर पटेलने दोन विकेट्स घेतल्या. या काळात शमीने एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० बळी पूर्ण केले. बांगलादेशकडून तौहीद व्यतिरिक्त झाकीरने ११४ चेंडूत चार चौकारांसह ६८ धावा केल्या. तौहीद आणि ह्रदयॉय वगळता बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाला कामगिरी करता आली नाही. त्यांच्या चार फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही, तर तीन खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तन्जीद हसनने २५ आणि रिशाद हुसेनने १८ धावांचे योगदान दिले.

अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली 

रोहित शर्मा याने स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडल्यामुळे अक्षर पटेल याची हॅटट्रिक घेण्याची संधी हुकली. अक्षर याने तन्झिद हसन, मुशफिकुर रहीम यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर जाकर अली याचा सोपा झेल रोहितकडे गेला. परंतु, रोहितला हा सोपा झेल घेता आला नाही.  त्यामुळे रोहितला ट्रोल करण्यात आले. जाकर अली याने ६८ धावांची खेळी करुन भारतीय संघाच्या अडचणीत भर घातली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *