
पुणे : पुण्यातील लोकप्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सुपर सनी विक या क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित सोमेश्वर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत अन्विता हिने १५ व १७ वर्षांखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, स्थाव्य सिद्धार्थ, ईशान मुलांगे, शिवेन लांबा, मृणाली बडगुजर, चैतन्य सक्ते आणि मनस्वी गाडे यांनी विजेतेपद पटकावले.
द लाईफ स्पोर्ट्स, सोमेश्वरवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात स्थाव्य सिद्धार्थने देव मल्लूचा १५-४, १५-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर मुलींच्या गटात पाटील हिने अन्या हळदणकरचा १५-४, १५-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात शिवेन लांबाने कबीर तांबेचा १५-१७, १६-१४, १५-०९ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. तर, मुलींच्या गटात मृणाली बडगुजरने आदित्री चौधरीचा १५-११, १८-१६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात अन्विता एम हिने प्रत्यशा दलाईचा १५-०६, १५-१२ असा पराभव केला. तर मुलांच्या गटात ईशान मुलांगेने ओम केनेला १३-१५, १५-११, १५-१३ असे पराभूत करून केले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात साईश बी याने संतोष मेघावतचा ०७-१५, १५-१२, १५-०८ कडवा प्रतिकार करत विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात अन्विता एम हिने मनस्वी गाडेवर १६-१४, १५-१० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात चैतन्य सक्तेने साईश बीचा १४-१६, १५-१०, १५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, याच मुलींच्या गटात मनस्वी गाडेने नीती पंडितचा १५-११, १५-११ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
पुरुष दुहेरीत अंतिम लढतीत ओम भावेने युवराज पारगेच्या साथीत अभिजीत दलाल व अभिषेक मुरकुटे यांचा १५-११, १५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला दुहेरीत चैत्रलेखा देवधर व मधुरा फडके यांनी अमिता वाळुंजकर व विद्या पंडित यांचा १३-१५, १५-०६, १५-११ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मधुरा सनी निम्हण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुश्ताक अली आणि सागर मंत्रेशी आदी मान्यवर उपस्थित होते.