
दुहेरीत भारताच्या निकी कालियांदा पोनाचा व झिम्बावेच्या कोर्टनी जॉन लॉक यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत ब्रँडन होल्ट, बिली हॅरिस, खुमोयुन सुलतानोव, उगो ब्लँचेट यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुहेरीत भारताच्या यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस संकुलात सुरू असंलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या निकी कालियांदा पोनाचा याने झिम्बावेच्या कोर्टनी जॉन लॉकच्या साथीत ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित ब्लेक एलिस व ट्रिस्टन स्कूलकेट यांचा सुपरटायब्रेकमध्ये ७-६ (४), ६-७ (४), १०-८ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. हा सामना १ तास ४६ मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे हा सेट टायब्रेक गेला. टायब्रेकमध्ये निकी व लॉक यांनी ब्लेक व ट्रिस्टन यांची नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ७-६ (४) असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये ब्लेक व ट्रिस्टन यांनी जोरदार खेळ करत निकी व लॉक विरुद्ध हा सेट ७-६ (४) असा जिंकून बरोबरी साधली. सुपर टायब्रेकमध्ये निकी व लॉक यांनी आक्रमक खेळ करत ब्लेक व ट्रिस्टनविरुद्ध हा सेट १०-८ असा जिंकून विजय मिळवला.
ग्रेट ब्रिटनच्या जे क्लार्क व ऑस्ट्रियाच्या ज्युरिज रॉडिओनोव यांनी पेट्र बार बिर्युकोव्ह व इलिया सिमाकिन यांचा ७-६ (५), ६-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक बेल्डन व मॅथ्यू क्रिस्तोफर रोमियोस यांनी इटलीच्या एनरिको डल्ला वॅले व उझबेकिस्तानच्या खुमोयुन सुलतानोव यांचा ६-३, ४-६, १२-१० असा पराभव केला.
एकेरीत दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित ग्रेट ब्रिटनच्या बिली हॅरिस याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या हिरोकी मोरियाचा ७-५, ६-३ असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. संघर्षपूर्ण लढतीत उझबेकिस्तानच्या खुमोयुन सुलतानोव याने ऑस्ट्रेलियायच्या बर्नार्ड टॉमिकचा ४-६, ६-३, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव केला. सहाव्या मानांकित अमेरिकेच्या ब्रँडन होल्ट याने फ्रांसच्या सचा ग्वेमार्ड वेनबर्गचा ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.