
आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धा
पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजने विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
वानवडी येथील एसआरपीएफच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत भारती विद्यापीठ संघाने कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघावर शूटआउटमध्ये ४-२ अशी मात केली आणि विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. त्यानंतर शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात भारती विद्यापीठ संघाकडून दीपक कश्यप, आर्यसेन काळे, ऋषी निखळ, ऋतुराज वाडेलकार यांनी गोल केले, तर कोल्हापूरच्या संघाकडून सुजल हळदे, आर्यन खवाटे यांनाच गोल करता आले.

मुलींमध्ये भानूबेन नानावटी कॉलेजला जेतेपद
मुलींच्या गटात भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत भानूबेन नानावटी कॉलेज संघाने पिंपरी-चिंचवडच्या एस बी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २-१ ने मात केली. ही लढत अखेरपर्यंत चुरशीची झाली. यात भानूबेन नानावटी कॉलेजकडून सेजल तोटे (८ मि) आणि समृद्धी शेंडे (२० मि) यांनी गोल केले, एस बी पाटील कॉलेजकडून एकमेव गोल आर्या राठोडने (१५ मि) केला.
विजेत्यांना बास्केटबॉलपटू श्रुतिका अरगडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिजित भाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे चेअरमन अभय छाजेड, विश्वस्त इंद्रकुमार छाजेड, युवराज शहा, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळीया उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र; तसेच विजेता व उपविजेता संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. क्रीडा संघातील प्रथम चांडक, समृद्धी गोसावी, यश नाईक, कार्तिक हाडके, ऋषिकेश लोहाटे, सहायक कर्ण तोरस्कर, प्रणय समर्थ, नीरज वाघ यांनी आयोजनात सहभाग घेतला.