
सोपा झेल सोडल्याने रोहित निराश
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश संघावर सहा विकेटने विजय नोंदवला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले. झाकीर अली याचा सोपा झेल सोडल्याची खंत देखील रोहितने व्यक्त केली.
भारतीय संघाने बांगलादेशवर सहा विकेट्सने विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने २१ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. यादरम्यान, उपकर्णधार शुभमन गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. आयसीसी स्पर्धेतील गिलचे हे पहिले शतक आहे. तसेच मोहम्मद शमी याने पाच विकेट घेत २०० बळींचा टप्पा गाठला. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघाच्या कामगिरीबद्दल आणि खराब क्षेत्ररक्षणाविषयी सांगितले.
खराब क्षेत्ररक्षणाबद्दल रोहितने व्यक्त केली निराशा
खरंतर, बांगलादेशच्या डावाच्या नवव्या षटकात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला हॅटट्रिक घेण्याची संधी होती. चौथ्या चेंडूवर झाकीर अलीला शिकार करण्यासाठी त्याने संपूर्ण रणनीती तयार केली होती. परंतु रोहित शर्माच्या चुकीमुळे अक्षर पटेल याची हॅटट्रिक हुकली. याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘हा एक सोपा झेल होता, मी स्वतःसाठी ठरवलेल्या पातळीनुसार, मला तो झेल पकडायला हवा होता.’
गिल आणि शमीच्या कामगिरीवर कर्णधार खूश
शुभमन गिलची १०१ धावांची खेळी आणि मोहम्मद शमीची उत्कृष्ट गोलंदाजी (पाच विकेट) यामुळे भारताला सामना जिंकता आला. रोहित सामन्यानंतर म्हणाला की, ‘प्रत्येक सामन्यापूर्वी तुम्हाला आत्मविश्वासाने भरलेला असावा लागतो. सामन्यादरम्यान प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे लागते. एक संघ म्हणून, मला वाटते की आम्ही परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले.’
सामन्यादरम्यान येणाऱ्या चढ-उतारांबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘या पातळीच्या स्पर्धेत नेहमीच दबाव असतो पण अशा परिस्थितीत अनुभव कामी येतो. शमी आमच्यासाठी प्रत्येक परिस्थितीत उपयुक्त आहे. मला वाटलं होतं की तुम्ही सोडलेल्या झेलांबद्दल बोलाल पण गिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहणे अद्भुत होते.’
मी खूप आनंदी आहे : शुभमन गिल
शुभमन गिलने १२५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले. त्याच्या शानदार शतकी कामगिरीबद्दल बोलताना गिल म्हणाला की, ‘हे निश्चितच माझ्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होते. आयसीसी स्पर्धेत हे माझे पहिले शतक आहे. मी खूप आनंदी आहे. खेळपट्टी सोपी नव्हती. सुरुवातीला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नव्हता. म्हणून मी वेगवान गोलंदाजांविरुद्ध क्रीजचा वापर केला.‘