
मुंबई : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत सलग दोन विजय मिळवित बाद फेरी गाठण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
महाराष्ट्राची साखळीतील अंतिम लढत त्रिपुरा संघाशी होईल. ओडिसा, कटक येथील जे एन बंदिस्त क्रीडा संकुलात सकाळच्या सत्रात झालेल्या क गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा प्रतिकार ३७-२४ असा सहज मोडून काढला. पहिल्या डावात अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ १२-१२ अशा बरोबरीत होते. दुसऱ्या डावात हिमाचलने महाराष्ट्राचे शिलकी दोन गडी बाद करीत पहिला लोण देत आघाडी घेतली. पण यातून सावरत महाराष्ट्राने लोणची परत फेड करीत आघाडी घेतली. नंतर पुन्हा एक लोण देत आपली आघाडी वाढविली. शेवटी १३ गुणांच्या फरकाने सामना महाराष्ट्राने आपल्याकडे झुकविला. शिवम पठारे, अजित चौहान यांच्या भेदक चढाया त्यांना शंकर गदईची मिळालेली बचावाची साथ यामुळे हे शक्य झाले.
या अगोदर पहिल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राने केरळचा प्रतिकार ३९-३५ असा मोडून काढला. सुरुवात झोकात करणाऱ्या महाराष्ट्राला पूर्वार्धात केरळने चांगलेच जेरीस आणले. शिलकी दोन-तीन गड्यात महाराष्ट्राला गुण घेता येत नव्हते. त्यातच पूर्वार्धात त्यांच्या ४ अव्वल पकड झाल्या. त्यामुळे विश्रांतीला १९-१६ अशी केरळ संघाकडे आघाडी होती. शेवटची ५ मिनिटे असे पर्यंत केरळने सामन्यावर वर्चस्व राखले होते. पण लोणची परतफेड करत महाराष्ट्राने कमबॅक करीत आपल्या आशा पल्लवीत केल्या. शेवटची २ मिनिटे शिल्लक असताना महाराष्ट्राने ३६-३४ अशी आघाडी घेतली. शेवटी ४ गुणांनी विजय मिळविला पहिली साखळी लढत जिंकली. शिवम पठारे, अजित चौहान यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
विजयात प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांनी शेवटच्या क्षणी केलेले मार्गदर्शन ही मोलाचे ठरले. पूर्ण डावात महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या ७ते८ अव्वल पकड झाल्या. दोन किंवा तीन खेळाडूत हमखास गुण घेणारा खेळाडू महाराष्ट्राकडे नसावा. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे का?