
मुंबई : इंटरनॅशनल मास्टर्स लीग २२ फेब्रुवारीपासून नवी मुंबई येथे सुरू होणार आहे आणि यात क्रिकेटच्या दिग्गजांचा जबरदस्त संघ पाहायला मिळेल.
या स्पर्धेत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा आणि ख्रिस गेल, श्रीलंकेचे कुमार संगकारा, दक्षिण आफ्रिकेचे जॅक्स कॅलिस आणि जॉन्टी ऱ्होड्स, इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ईयान मॉर्गन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन यांसह अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचे सर्व सामने थेट प्रक्षेपण २२ फेब्रुवारीपासून जिओहॉटस्टारवर उपलब्ध असणार आहे. दररोज संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सामने प्रसारित होतील. नवी मुंबईतील पाच रोमांचक सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग पुढील टप्प्यासाठी वडोदरा येथे होतील व नंतर रायपूर येथे स्पर्धेचे उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाईल.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स आणि कुमार संगकाराच्या नेतृत्वाखालील श्रीलंका मास्टर्स यांच्यातील रोमांचक उद्घाटनीय सामना पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सामन्यासाठी विद्यार्थ्यांना आणि वरिष्ठ नागरिकांना विनामूल्य तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक संस्थेचे वैध ओळखपत्र सादर करून तर वरिष्ठ नागरिकांनी शासकीय मान्यता प्राप्त ओळखपत्र सादर करून ही विनामूल्य तिकिटे २० फेब्रुवारीपासून डी वाय पाटील स्टेडियमच्या बॉक्स ऑफिसवर घेऊ शकतात.
डी वाय पाटील स्टेडियम हे त्याच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची आसन क्षमता ५५ हजार असून, येथे दर्जेदार क्रिकेट खेळासाठी योग्य खेळपट्टी उपलब्ध आहे.
या स्पर्धेबद्दल आनंद व्यक्त करताना डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आणि डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष डॉ विजय पाटील म्हणाले की, ‘डी वाय पाटील स्टेडियमवर इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या पहिल्या स्पर्धेचे आयोजन करणे ही आमच्यासाठी मोठी प्रतिष्ठेची बाब आहे. या मैदानाचा दर्जेदार क्रिकेटशी नेहमीच संबंध राहिला आहे आणि क्रिकेटच्या दिग्गजांना पुन्हा एकदा चाहत्यांसमोर खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. संपूर्ण तयारी जोरात सुरू असून, चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.’