मालाडमध्ये रविवारी ‘ज्युनियर मुंबई श्री’चा थरार

  • By admin
  • February 21, 2025
  • 0
  • 105 Views
Spread the love

मुंबई : मुंबईतील उदयोन्मुख आणि उत्साही शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी प्रतिष्ठेची ‘ज्युनियर मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या रविवारी (२३ फेब्रुवारी) मालाड येथे रंगणार आहे.

दीनदयाल उपाध्याय मैदान, कासम बाग, मालाड पूर्व येथे होणाऱ्या या स्पर्धेत १००-१२० नवोदित शरीरसौष्ठवपटू आपली नवनिर्मित शरीरयष्टी सादर करताना दिसतील. विशेष म्हणजे, यंदा दिव्यांग, महिला, मास्टर्स आणि फिजीक स्पोर्ट्स गटांचा समावेश करण्यात आल्याने ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

मुंबईतील नवोदितांसाठी सुवर्णसंधी
मुंबईतील जिमप्रेमी तरुण गेल्या तीन-चार महिन्यांपासून या स्पर्धेसाठी जोरदार मेहनत घेत आहेत. शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकणाऱ्या नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जय वरदानी ट्रस्टच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्यांसाठी एक लाखांपेक्षा अधिक बक्षिसांची बरसात
यंदा विजेत्यांना एक लाखांपेक्षा अधिक रोख बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. ज्युनियर मुंबई श्री विजेत्याला तब्बल १५,००० रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विविध गटांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना भरघोस बक्षिसे दिली जातील, अशी माहिती अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली.

स्पर्धेसाठी वयोमर्यादा आणि कठोर नियमावली
अनधिकृतरित्या वय लपवून खेळण्याचे प्रकार रोखण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांनी वयोमर्यादा तपासणीसाठी कठोर नियम लागू केले आहेत. ज्युनियर मुंबई श्री गटातील स्पर्धकांचा जन्म १ जानेवारी २००२ नंतरचा असावा. मास्टर्स गटातील स्पर्धकांचा जन्म १ जानेवारी १९८५ पूर्वीचा असावा. सर्व स्पर्धकांना आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही दोन मूळ पुरावे व झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे. जर कोणी वय लपवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवले जाईल, असे सरचिटणीस राजेश सावंत यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेची वजन तपासणी आणि वेळेचे नियोजन
स्पर्धेतील सर्व खेळाडूंची वजन आणि उंची तपासणी रविवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत पार पडणार आहे. स्पर्धेवर वेळेचे बंधन असल्याने सर्व खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस विशाल परब यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती किंवा सहभागी होण्यासाठी सुनील शेगडे (९२२३३४८५६८), राम नलावडे (९८२०६६२९३२), विजय झगडे (९९६७४६५०६३), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), राजेश निकम (९९६९३६९१०८) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *