दक्षिण आफ्रिकेचा १०७ धावांनी मोठा विजय

  • By admin
  • February 21, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

रेयान रिकेल्टनचे दमदार शतक, रहमत शाहची एकाकी झुंज देत ९० धावांची खेळी

कराची : सलामीवीर रेयान रिकेल्टनचे (१०३) आक्रमक शतक आणि वेगवान गोलंदाज यांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने अफगाणिस्तान संघाचा १०७ धावांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली. रहमत शाह याची ९० धावांची झुंज एकाकी ठरली.

पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघासमोर विजयासाठी ३१६ धावांचे आव्हान होते. परंतु, अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. रहमानउल्लाह गुरबाज (१०), इब्राहिम झद्रान (१७) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. सेदिकुल्लाह अटल (१६), हशमतुल्लाह शाहिदी (०), अझमतुल्लाह उमरझाई (१८), मोहम्मद नबी (८), गुलबदिन नायब (१३), रशीद खान (१८) हे फलंदाज खराब फटके मारुन बाद झाले. त्याचा फटका अफगाणिस्तान संघाला बसला.

एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना रहमत शाह याने एकट्याने झुंज देत अर्धशतक ठोकले. त्यामुळे अफगाणिस्तान संघ थोडी झुंज देऊ शकला. रहमत याने ९२ चेंडूत ९० धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याने नऊ चौकार व एक षटकार मारला. रबाडा याने त्याला बाद करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अफगाणिस्तान संघाचा डाव ४३.३ षटकात २०८ धावांवर संपुष्टात आला.

दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी नोंदवली. कागिसो रबाडा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याने ३६ धावा दिल्या. लुंगी न्गिडी (२-५६), विआन मुल्डर (२-३६) यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. मार्को जॅनसेन (१-३२), केशव महाराज (१-४६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिका सहा बाद ३१५

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रेयान रिकेल्टनच्या आक्रमक १०३ धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने ५० षटकात सहा बाद ३१५ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. टोनी डी झोर्झी ११ धावांवर बाद झाला. आफ्रिका संघाला २८ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रिकेल्टन व कर्णधार बावुमा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करत डावाला एक भक्कम आकार दिला. बावुमा ७६ चेंडूत ५८ धावांची खेळी करुन बाद झाला. अफगाणिस्तान संघासाठी धोकादायक बनलेली ही जोडी नबी याने फोडली.

रिकेल्टन व व्हॅन डेर ड्यूसेन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. रिकेल्टन याने १०६ चेंडूत धमाकेदार शतक ठोकले. त्याने एक षटकार व सात चौकार मारले. रशीद खान व गुरबाज यांनी रिकेल्टनला धावबाद करुन मोठे यश मिळवून दिले.

परंतु, ड्यूसेन व मार्कराम या जोडीने ४७ धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. ड्यूसेन याने ४६ चेंडूत दोन षटकार व तीन चौकारांसह ५२ धावा फटकावल्या. मार्कराम याने ३६ चेंडूत नाबाद ५२ धावांची दमदार अर्धशतकी खेळी साकारली. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. डेव्हिड मिलर (१४), मल्डर (नाबाद १२) या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला ३१५ धावसंख्या उभारुन दिली.

अफगाणिस्तान संघाकडून नबी याने ५१ धावांत दोन विकेट घेतल्या. फजलहक फारुकी (१-५९), अझमतुल्लाह (१-३९), नूर ्अहमद (१-६५) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यांचा सर्वात हुकमी गोलंदाज रशीद खान याला एकही विकेट घेता आली नाही. रशीद याने १० षटकात ५९ धावा दिल्या. रशीदच्या अपयशाचा फटका अफगाणिस्तान संघाला बसला.

शनिवारचा सामना

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

गद्दाफी स्टेडियम, लाहोर, वेळ : दुपारी २.३० वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *