मुंबई इंडियन्स संघाचा आरसीबीवर रोमहर्षक विजय

  • By admin
  • February 21, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

हरमनप्रीत कौर, अमनजोत कौरची शानदार फलंदाजी 

बंगळुरू : कर्णधार हरमनप्रीत कौर (५०), अमनजोत कौर (नाबाद ३४), ब्रंड (४२) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत गतविजेत्या आरसीबी संघावर चार विकेट राखून विजय नोंदवला. युवा फलंदाज जी कमलिनी हिने २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुरेख चौकार ठोकत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी १६८ धावांची आवश्यकता होती. परंतु, यास्तिका भाटिया (८) आणि हेली मॅथ्यूज (१५) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. नॅट सायव्हर ब्रंट हिने २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, किम गार्थ हिने तिला क्लीन बोल्ड करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. ब्रंट बाद झाली तेव्हा मुंबईची स्थिती तीन बाद ७४ अशी होती. 

कर्णधार हरमनप्रीत कौर व अमेलिया केर या अनुभवी जोडीवर मुंबई इंडियन्सची भिस्त होती. परंतु, केर केवळ २ धावांवर बाद झाली. त्यामुळे मुंबई संघ अधिकच दबावात आला. हरमनप्रीत कौर हिने अवघ्या ३८ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी साकारत डाव सावरला. तिने एक षटकार व आठ चौकार मारले. जॉर्जिया वेअरहॅम हिने तिला बाद करुन मोठा अडथळा दूर केला. जॉर्जिया हिने लगेचच सजीवन संजना हिला (०) खाते उघडू न देता पायचीत बाद केले. त्यावेळी मुंबईची स्थिती १७.३ षटकात सहा बाद १४४ अशी बिकट झाली. 

त्यानंतर अमनजोत कौर हिने २७ चेंडूत ािबाद ३४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने १९व्या षटकात दोन उत्तुंग षटकार ठोकत संघाला विजयासमीप आणले. कमलिनी हिने ८ चेंडूत नाबाद ११ धावा फटकावल्या. तिने मारलेला विजयी चौकार कायम लक्षात राहील. आरसीबी संघाकडून जॉर्जिया वेअरहॅम हिने २१ धावांत तीन विकेट घेतल्या. गार्थ हिने ३० धावांत दोन बळी घेतले. 

आरसीबी सात बाद १६७ 

मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकात सात बाद १६७ धावा केल्या. आरसीबीने खराब सुरुवातीतून सावरत खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. त्यामध्ये सर्वात मोठे योगदान एलिस पेरी हिचे होते. पेरी हिने अवघ्या ४३ चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी केली. तिच्याशिवाय रिचा घोषने २८ धावा फटकावल्या. कर्णधार स्मृती मानधनाने २६ धावांचे योगदान दिले. एलिस पेरी ही महिला प्रीमिटर लीग इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.

बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी फलंदाजीसाठी मैदानात आली तेव्हा कर्णधार स्मृती मानधनाने स्फोटक फॉर्म दाखवला आणि १३ चेंडूत २६ धावा केल्या. यादरम्यान तिने ४ चौकार आणि एक षटकारही मारला. डॅनिएल वायट लवकर बाद झाली, पण एलिस पेरी पुन्हा एकदा आरसीबी संघासाठी तारणहार ठरली.

एलिस पेरीने ‘वन वुमन आर्मी’ शैलीत ८१ धावांची खेळी खेळली आणि आरसीबीला १६७ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. आरसीबीने ५७ धावांवर ४ विकेट गमावल्या आणि संघ १०० धावांपूर्वीच सर्वबाद होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण अ‍ॅलिस पेरीने रिचा घोषसोबत मिळून ५० धावांची महत्त्वाची भागीदारी करून बंगळुरूला सामन्यात परत आणले. एका बाजूला पेरीने ८१ धावा केल्या आणि रिचा घोषने २८ धावा केल्या.

मुंबईच्या अमनजोत कौर हिने २२ धावा देऊन ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तिने ८१ धावा करणाऱ्या एलिस पेरीची विकेटही घेतली. अमनजोत व्यतिरिक्त संस्कृती गुप्ता, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट आणि शबनीम इस्माइल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *