
पुणे विभाग उपविजेता, नागपूर विभाग तृतीय
छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले.
चिकलठाणा येथील शिवनेरी लॉन्स येथे राज्यस्तरीय शालेय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, लातूर विभाग, मुंबई विभाग, पुणे विभाग अशा विविध विभागातील संघांनी सहभाग घेतला होता.
१९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात एअर शिल्ड या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, क्रीडा अधिकारी रामकिसन मायंदे, क्रीडा अधिकारी खंडूराव यादवराव, संघटनेचे राज्य सचिव मिलिंद काटमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले. पुणे विभाग संघ उपविजेता ठरला. नागपूर विभाग संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे अॅड भाऊसाहेब साबळे, श्रीराम फायनान्सचे शालीग्राम तुरे, शिवसेना तालुका प्रमुख भास्करराव मुरमे, कैलास उकर्डे, पवन लाटे, क्रीडा अधिकारी खंडूराव यादवराव यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करताना वेदांत पाटील (सुवर्ण), मुज्जकिर शेख (रौप्य), मोहम्मद अली (रौप्य), करण राठोड (रौप्य), भूमी भोजपुरे (रौप्य), मारिया इम्रान खान, मसीरा शेख (सुवर्ण), ऋतुजा देवरे (सुवर्ण), हर्षदा पाखडे (सुवर्ण) यांनी चमकदार कामगिरी नोंदवली.