
क्रिश शहापूरकर, सचिन लव्हेरा, शिवराज शेळके, आत्मा मोरेची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य डेक्कन जिमखाना संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर जोरदार कामगिरी नोंदवत सेंट्रल झोन संघाचा १६६ धावांनी पराभव केला.
सार्क क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. सेंट्रल झोन संघाने पहिल्या डावात ४२.४ षटकात सर्वबाद २१८ धावसंख्या उभारली. त्यानंतर डेक्कन जिमखाना संघ २५.१ षटकात अवघ्या १०८ धावांत गारद झाला. सेंट्रल झोनचा कर्णधार सचिन लव्हेरा याने डेक्कन जिमखाना संघाला फॉलोऑन दिला. त्यानंतर डेक्कन जिमखाना संघाने फॉलोऑनमध्ये खेळताना दुसऱ्या डावात ५४ षटकात सात बाद ३१५ अशी भक्कम धावसंख्या उभारत डाव घोषित केला. सेंट्रल झोन संघ दुसऱ्या डावा १२.१ षटकात केवळ ३९ धावांत गडगडला. डेक्कन जिमखाना संघाने १६६ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात क्रिश शहापूरकर याने १३८ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने सात षटकार व बारा चौकार मारले. सचिन लव्हेरा याने ७२ चेंडूत ८५ धावांची शानदार खेळी साकारली. सचिन याने आठ उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. देवराज बेद्रे याने दोन षटकार व आठ चौकारांसह ७२ धावांची बहारदार खेळी केली.
गोलंदाजीत शिवराज शेळके याने १७ धावांत सात विकेट घेऊन सामना गाजवला. आत्मा पोरे याने १३ धावांत सात विकेट घेऊन संघाला मोठा विजय मिळवून दिला. शिवराज शेळके याने ६३ धावांत पाच गडी बाद केले. या सामन्यात शिवराज शेळके याने एकूण १२ विकेट घेण्याचा पराक्रम केला.