
‘भारताला आम्ही दुबईत दोनदा हरवले आहे, कोणताही दबाव नाही’
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील महत्त्वाच्या सामन्याभोवती प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना कोणताही दबाव नाही असे सांगत डिवचले आहे. भारतीय संघाविरुद्धचा सामना हा इतर कोणत्याही सामन्याप्रमाणे आहे आणि जेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आमचे विजयाचे लक्ष्य आहे, असे हरिस रौफ याने सांगितले.
कराचीतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर, आठ संघांच्या या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला भारताला हरवावे लागेल. बांगलादेश संघाविरुद्ध सहा विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ या उच्च दबावाच्या सामन्यात उतरणार आहे. हरिस रौफ म्हणाला की, ‘भारताविरुद्धच्या सामन्यात कोणताही दबाव नाही, सर्व खेळाडू तणावमुक्त आहेत आणि आम्ही तो इतर कोणत्याही सामन्याप्रमाणे घेऊ.’
पाकिस्तान भारताला हरवू शकतो
हरिस रौफ म्हणाला की, ‘तो १०० टक्के मॅच-फिट आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध १० षटके टाकून त्याने हे सिद्ध केले आहे. आम्ही दुबईमध्ये भारताला दोनदा हरवले आहे, त्यामुळे आम्हाला येथील परिस्थिती चांगली माहिती आहे. आमचा संपूर्ण प्लॅन सामन्याच्या दिवसाच्या परिस्थिती आणि खेळपट्टीवर अवलंबून असेल.’
या दरम्यान, रौफ याने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाबद्दल सांगितले. रौफ पुढे म्हणाला की, ‘तो सामना संपला आहे आणि आता खेळाडूंचे लक्ष भारताविरुद्धच्या सामन्यावर आहे. त्याच्या संघाला सैम अयुब आणि फखर जमान यांची उणीव भासेल. अयुब आणि आता फखरची अनुपस्थिती चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमच्यासाठी मोठा धक्का आहे. पण आमच्याकडे अजूनही चांगले प्रदर्शन करण्यासाठी आणि या स्पर्धेत आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी खेळाडू आहेत.’
रौफ म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडूला हे समजते की भारताविरुद्धच्या सामन्यात हिरो बनण्याची उत्तम संधी आहे परंतु जर त्यांनी संयम राखला आणि चांगली कामगिरी केली तरच हे शक्य होईल.’