
मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई यांच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धेत कुर्ला नागरिक सहकारी बँकेने शानदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.
अंतिम सामन्यात योगेश जगदारे, अनिकेत गाढवे आणि अनिल नरसाळे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर कुर्ला नागरिक बँकेने गतविजेत्या हिंदुस्थान को-ऑप. बँकेचा ९ गडी राखून पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडियमवर हिंदुस्थान बँक विरुद्ध कुर्ला नागरिक बँक यांच्यात अंतिम सामना रंगला. हिंदुस्थान बँकेचा सलामीवीर अनिरुद्ध रासकरने १० चेंडूत २६ धावा करत आक्रमक सुरुवात दिली. मात्र, दुसऱ्या बाजूने कुर्ला नागरिक बँकेच्या अनिकेत गाढवे (११ धावांत २ बळी) आणि अनिल नरसाळे (२ चेंडूत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करत हिंदुस्थान बँकेची धावसंख्या मर्यादित ५ षटकांत ५ बाद ३७ धावांपर्यंतच रोखली.
लक्ष्याचा पाठलाग करताना योगेश जगदारेने १३ चेंडूत नाबाद २६ धावा फटकावत संघाला सहज विजय मिळवून दिला. कुर्ला नागरिक बँकेने केवळ ३.२ षटकांत १ बाद ३८ धावा करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान
सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू : अनिकेत गाढवे, उत्कृष्ट फलंदाज : राहुल मुळीक, उत्कृष्ट गोलंदाज : किशोर गुंगवरे
स्पर्धेतील चुरशीचे क्षण
उपांत्य फेरीत हिंदुस्थान बँकेने महानगर बँकेचा १० गडी राखून पराभव केला, तर कुर्ला नागरिक बँकेने सांगली सहकारी बँकेला १७ धावांनी नमवले.
बक्षीस समारंभात मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचा बक्षीस समारंभ युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम, हिंदुस्थान बँकेचे उपाध्यक्ष नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील साळवी, नरेंद्र सावंत, प्रमोद पार्टे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, जनार्दन मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.