
लिजंड्स प्रीमियर लीग : डॉ कार्तिक बाकलीवाल सामनावीर

छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने श्लोक वॉरियर्स संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत आगेकूच केली. डॉ कार्तिक बाकलीवाल याने सामनावीर किताब पटकावला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. श्लोक वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय श्लोक संघाला महागात पडला. श्लोक वॉरियर्स संघ २० षटकात १२८ धावांत सर्वबाद झाला. सलामीवीर सय्यद फरहान याने सर्वाधिक ३९ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. माजी रणजीपटू अनंत नेरळकर याने १७ चेंडूत दोन चौकारांसह ११ धावांचे योगदान दिले. प्रवीण क्षीरसागर याने १६ चेंडूत २२ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने चार चौकार ठोकले. आमेर बदाम याने नाबाद १५ धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार व एक चौकार मारला. अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत.
मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाकडून रमेश साळुंके (२-३१) व पंकज हिवाळे (२-१९) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रणजित (१-१७), डॉ सुनील काळे (१-२८), नितीन चव्हाण (१-२३), आशिष भारुका (१-६) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मीनाक्षी संघाकडून सर्वच गोलंदाजांनी सुरेख मारा करत विकेट घेत श्लोक वॉरियर्स संघाला १२८ धावांत रोखले.

मीनाक्षी इंडस्ट्रीज संघासमोर विजयासाठी १२९ धावांचे माफक लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने १२.३ षटकात एक बाद १२९ धावा फटकावत नऊ विकेट राखून सामना जिंकला. डॉ कार्तिक बाकलीवाल व डॉ सुनील काळे या सलामी जोडीने १०.४ षटकात १२३ धावांची भागीदारी करुन सामना एकतर्फी बनवला. विजयासाठी सहा धावांची गरज असताना कार्तिक बाकलीवाल बाद झाला. कार्तिक याने अवघ्या ३६ चेंडूत ८६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी करत सामना एकहाती जिंकून दिला. कार्तिक याने या स्फोटक खेळीत तब्बल सहा उत्तुंग षटकार व नऊ चौकार ठोकले. डॉ सुनील काळे याने ३४ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने पाच चौकार मारले. संदीप फोके याने नाबाद ४ धावा काढल्या. एकमेव बळी सय्यद फरहान याने १४ धावा देत मिळवला.
संक्षिप्त धावफलक : श्लोक वॉरियर्स : २० षटकात सर्वबाद १२८ (मयूर अग्रवाल ७, सय्यद फरहान ३९, अनंत नेरळकर ११, प्रवीण क्षीरसागर २२, आमेर बदाम नाबाद १५, अनिरुद्ध पुजारी ७, इतर १८, पंकज हिवाळे २-१९, रमेश साळुंके २-३१, रणजित १-१७, डॉ सुनील काळे १-२८, नितीन चव्हाण १-२३, आशिष भारुका १-६) पराभूत विरुद्ध मीनाक्षी इंडस्ट्रीज : १२.३ षटकात एक बाद १२९ (डॉ सुनील काळे नाबाद ३७, डॉ कार्तिक बाकलीवाल ८६, संदीप फोके नाबाद ४, सय्यद फरहान १-१४). सामनावीर : डॉ कार्तिक बाकलीवाल.