
स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय आवश्यक
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही ठिकाणी सामना होतो तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा प्रचंड उत्साह शिगेला पोहोचतो. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाचा सहा विकेट राखून पराभव केला आहे तर पाकिस्तान संघाला न्यूझीलंड संघाकडून ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामना आणि सामन्याचा निकाल हा स्पर्धेचे गणित बदलून टाकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी यजमान पाकिस्तान संघाला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. पराभव झाल्यास पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर मोठा दबाव असणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेश संघावर सहा विकेटने विजय साकारत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
बांगलादेश संघाविरुद्ध भारतीय गोलंदाज व फलंदाज या दोघांनीही दमदार कामगिरी केली आहे. खास करुन शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. शुभमन गिल याने चॅम्पयिन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना खेळताना शतक झळकावले. मोहम्मद शमी याने पाच विकेट घेऊन २०० विकेटचा टप्पा गाठला आहे. दुखापतीमुळे शमी जवळपास दीड वर्षांनी भारतीय संघातून खेळत होता. परंतु, या सामन्यात शमीने बुमराहची उणीव कोठेही जाणवू दिली नाही हे विशेष. हर्षल राणा याने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेऊन त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव ही भारतीय फिरकी त्रिमूर्ती प्रचंड फॉर्मात आहे.
भारतीय संघाला फलंदाजीत अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याला त्याची लय सापडली असली तर आक्रमक फटकेबाजीच्या मोहात त्याची विकेट जाते. पहिल्या सामन्यात रोहितने असाच एक फटका मारुन आपली विकेट गमावली होती. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्याकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. विराट कोहली पाकिस्तान संघाविरुद्ध हमखास मोठी खेळी करत आलेला आहे. याही लढतीत कोहली ‘विराट’ कामगिरी करेल अशी आशा क्रिकेट चाहते बाळगून आहेत. पाकिस्तान संघाविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे ऋषभ पंत याला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागणार आहे.
दुसरीकडे पाकिस्तान संघासाठी हा सामना ‘करो वा मरो’ असा आहे. भारताने सामना जिंकला तर पाकिस्तान संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे गतविजेत्या पाकिस्तान संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचा मोठा दबाव पाकिस्तानच्या खेळाडूंवर असणार यात शंकाच नाही. पहिल्या सामन्यात बाबर आझम याने अर्धशतक ठोकले असले तरी त्याने त्यासाठी ९० चेंडू घेतले. दुखापतीमुळे फखर झमान हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी इमाम उल हक याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सौद शकील याचा खराब फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजी विभाग उत्कृष्ट आहे. त्यामुळे गोलंदाजीत विभागात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. परंतु, फलंदाजीत मात्र, काही बदल निश्चित केले जाऊ शकतात.
थेट प्रक्षेपण : दुपारी २.३० वाजता (जिओ हॉटस्टार)