स्पर्धेत पुण्यातील १४० महाविद्यालये, महाराष्ट्रातून १० व इतर राज्यातून ३ महाविद्यालयांचा सहभाग
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे १८व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट २०२५’ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. ही स्पर्धा २००४ पासून घेण्यात येत आहे.
सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी बरोबर अन्य शाखेतील विद्यार्थांना त्यांच्या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही व क्रीडा नैपुण्य असूनही त्यांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही. ही निकड दूर करण्यासाठी एमआयटी संस्था गेली १८ वर्षे समिट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत आलेली आहे. सर्वप्रथम २००४ साली स्पर्धेची सुरूवात झाली. २००७ सालापासून सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून याआधी व्हीव्हीएस लक्ष्मण, सुशील कुमार, विजेंदर सिंग, मेरी कोम, दिलीप वेंगसरकर, इरफान पठाण, योगेश्वर दत्त, चेतेश्वर पुजारा, बायचुंग भुतिया, पीआर श्रीजेश, रेहान पोंचा व रंजन सोढी हे लाभले होते.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ येत्या २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडांगणावर होणार आहे. या समारंभासाठी अर्जुन पुरस्कार सन्मानित व पॅरा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीधर पेटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ विश्वनाथ दा कराड हे असतील. ही स्पर्धा एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याकारी अध्यक्ष डॉ राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
या समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात अद्वितीय खेळी खेळल्याबद्दल अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्कार तसेच, ज्युदो खेळातील शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित योगेश धाडवे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
११ लाख रुपयांची पारितोषिके
या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी व ई-स्पोर्टस अशा एकूण ९ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम असे एकूण ११ लाख रुपयांची बक्षिसे व प्रशस्तीपत्र दिली जातील. सर्व साधारण विजेत्या संघाला रोख बक्षिस व करंडक दिले जाईल. प्रत्येक क्रीडा प्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रोख पारितोषिक देण्यात येईल. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभ
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता माईर्स एमआयटी, पुणेच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी कुस्ती खेळासाठी अर्जुन अवार्ड आणि द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानीत सुजीत मान हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत पुणे विभागातून १४० महाविद्यालये, उर्वरित महाराष्ट्रातून १० व महाराष्ट्राबाहेरून ३ विद्यापीठ व महाविद्यालये असे एकूण १५३ महाविद्यालयांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत भाग घेतला आहे. या सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांचे मिळून एकूण सुमारे २२०० स्पर्धक भाग घेत आहेत. इतक्या व्यापक प्रमाणात खेळाडूंचा सहभाग असलेली देशातील ही एकमेव स्पर्धा आहे.
खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्वशांती हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा प्रमुख हेतू आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाखेरीज शारीरिक क्षमतेकडेही लक्ष द्यावे, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. विविध क्रीडाप्रकारांमधील निष्णात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा ‘समिट २०२५’ स्पर्धेच्या आयोजनातील एक प्रमुख हेतू आहे, अशी माहिती समिट २०२५ च्या आयोजन समितीचे एमआयटी डब्लयूपीयूचे विद्यार्थी प्रतिनिधी व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाचे सहयोगी संचालक प्रा विलास कथुरे व प्रा अभय कचरे, प्रा रोहित बागवडे, राहुल बिराजदार, निखिल वणवे आणि सहकारी बाळू सणस व अशोक नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.