
दुहेरीत भारताच्या जीवन नेद्दुचेझियान व विजय सुंदर प्रशांत यांना विजेतेपद
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर १०० पुरुष टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत ब्रँडन होल्ट, दलिबोर सेव्हर्सिना यांनी अनुक्रमे खुमोयुन सुलतानोव, ॲलेक्सिस गॅलार्नौ यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत भारताच्या जीवन नेद्दुचेझियान व विजय सुंदर प्रशांत यांनी विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस संकुलात सुरू असंलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित अमेरिकेच्या ब्रँडन होल्टने कॅनडाच्या आठव्या मानांकित ॲलेक्सिस गॅलार्नौचा ७-५, ६-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना १ तास ३४ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सामन्यात ५-३ अशी स्थिती असताना ॲलेक्सिसने होल्टची नवव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत बरोबरी साधली. सामना ६-६ असा बरोबरीत असताना होल्टने ॲलेक्सिसची सर्व्हिस भेदली व हा सेट ७-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. पहिल्याच गेममध्ये ॲलेक्सिसने होल्टची सर्व्हिस ब्रेक करून आघाडी मिळवली. पण ही आघाडी फार काळ ॲलेक्सिसला टिकवता आली नाही. सहाव्या गेममध्ये होल्टने ॲलेक्सिसची सर्व्हिस भेदली व सामन्यात बरोबरी निर्माण केली. त्यानंतर १० व्या गेममध्ये होल्टने ॲलेक्सिसने केलेल्या चुकांचा फायदा घेत त्याची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-४ असा जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याने उझबेकिस्तानच्या खुमोयुन सुलतानोवचा ६-७ (८), ६-०, ३-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना २ तास १३ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये खुमोयुनने जोरदार खेळ करत दलिबोरविरुद्ध हा सेट टायब्रेकमध्ये ७-६ (८) असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या दलिबोरने खुमोयुनला फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या गेममध्ये दलिबोरने खुमोयुनची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-० असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये चौथ्या गेममध्ये दलिबोरने खुमोयुनची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात ३-१ अशी आघाडी मिळवली. खुमोयुनने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली.
दुहेरीत अंतिम फेरीत भारताच्या जीवन नेद्दुचेझियान व विजय सुंदर प्रशांत या अव्वल मानांकित जोडीने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या मानांकित ब्लेक बेल्डन व मॅथ्यू क्रिस्तोफर रोमियोस यांचा ३-६, ६-३, १०-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना १ तास १७ मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये ब्लेक व मॅथ्यू यांनी आठव्या गेममध्ये जीवन व प्रशांतची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये जीवन व प्रशांत यांनी जोरदार पुनरागमन करत ब्लेक व मॅथ्यू यांची सहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून बरोबरी साधली. सुपर टायब्रेकमध्ये जीवन व प्रशांत यांनी आपले वर्चस्व कायम राखत ब्लेक व मॅथ्यू विरुद्ध हा सेट १०-० असा एकतर्फी जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला करंडक, १०० एटीपी गुण आणि ७ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे सह सचिव राजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एटीपी निरीक्षक उझबेकिस्तानचे आंद्रे कॉर्निलोव्ह आदी मान्यवर उपस्थित होते.