
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट : शेख सादिक सामनावीर

छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात नॉन स्ट्रायकर्स संघाने चुरशीच्या लढतीत डीएफसी श्रावणी संघावर दोन गडी राखून विजय मिळवला. रोमांचक सामन्यात शेख सादिक याने सामनावीर किताब पटकावला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डीएफसी संघाने १७.३ षटकात सर्वबाद १३६ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना नॉन स्ट्रायकर्स संघाला संघर्ष करावा लागला. मात्र, नॉन स्ट्रायकर्स संघाने १९.२ षटकात आठ बाद १४० धावा फटकावत दोन गडी राखून सामना जिंकला.

डीएफसी श्रावणी संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. पंकज (८), बाळासाहेब मगर (०) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. अशोक शिंदे याने अवघ्या ३५ चेंडूत ६९ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. अशोक शिंदे याने आपल्या आक्रमक खेळीत सात उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले.
त्यानंतर इशांत राय (११), निकित चौधरी (१४), दादासाहेब (नाबाद १९) यांनी आपले योगदान दिले. इम्रान खान (०), तनवीर राजपूत (२), नितीन भुईगळ (३), सिद्ध जैन (३), निलेश गवई (०) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्याचा फटका संघाला बसला.
नॉन स्ट्रायकर्स संघाकडून शेख सादिक (३-१४) व कर्णधार राजेश शिंदे (३-१७) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी तीन गडी बाद केले. लहू लोहार याने १५ धावांत दोन बळी टिपले. सुमित आगरे (१-२०), गिरीश खत्री (१-३३० यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
नॉन स्ट्रायकर्स संघासमोर विजयासाठी १३७ धावांचे आव्हान होते. इरफान पठाण (९), सिद्धांत पटवर्धन (७) ही सलामी जोडी झटपट तंबूत परतली. त्यानंतर आसिफ खान याने ४९ चेंडूंचा सामना करत ७० धावांची दमदार अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. त्याने एक षटकार व नऊ चौकार मारले.
एका बाजूने आसिफ खान आक्रमक फलंदाजी करत असताना शेख सादिक (१२), अमोल दौड (०), गिरीश खत्री (५), लहू लोहार (१२), निलेश जाधव (७) हे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे सामना रोमांचक स्थितीत पोहोचला. कर्णधार राजेश शिंदे (नाबाद १), जी सचिन (नाबाद ७) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
डीएफसी श्रावणी संघाकडून निलेश गवई याने प्रभावी गोलंदाजी करत ३४ धावांत तीन विकेट घेतल्या. पंकज याने ३ धावांत दोन विकेट घेऊन सामन्यात रोमांच आणला होता. इशांत राय याने १५ धावांत दोन बळी घतेले. बाळासाहेब मगर याने ३४ धावांत एक गडी बाद केला.