
जोश इंग्लिसच्या स्फोटक शतक; चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वात मोठा विजय
लाहोर : जोश इंग्लिसच्या (नाबाद १२०) अविश्वसनीय स्फोटक शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने ३५२ धावांचा डोंगर पादाक्रांत करुन चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील ऐतिहासिक विजय नोंदवला. इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या रचूनही ऑस्ट्रेलियाकडून पाच विकेटने पराभव स्वीकारावा लागला. धावांचा पाठलाग करताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी ३५२ धावांचे मोठे आव्हान होते. ट्रॅव्हिस हेड (६) आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ (५) हे अनुभवी फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट व मार्नस लाबुशेन या जोडीने ९५ धावांची भागीदारी करून सामन्यातील रोमांच कायम ठेवला. लाबुशेन पाच चौकारांसह ४५ चेंडूत ४७ धावांचे योगदान देत बाद झाला. पाठोपाठ शॉर्ट ६६ चेंडूत ६३ धावांची बहारदार खेळी करुन बाद झाला. त्याने एक षटकार व नऊ चौकार मारले. शॉर्ट याने प्रारंभी इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत सामन्यात रंगत आणली.
जोश इंग्लिस आणि अॅलेक्स कॅरी या जोडीने पाचव्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा कायम ठेवल्या. या जोडीने धावगती कायम ठेवत इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. ही जोडी अधिक धोकादायक बनत असताना कार्से याने कॅरी याला ६९ धावांवर बाद करुन संघाला मोठा दिलासा दिला.
ग्लेन मॅक्सवेल मैदानात उतरल्यानंतर जोश इंग्लिसची फटकेबाजी अधिक आक्रमक झाली. इंग्लिस याने अवघ्या ८६ चेंडूत नाबाद १२० धावांची वादळी खेळी साकारली. त्याने सहा टोलेजंग षटकार व आठ चौकार ठोकले. जोश इंग्लिस याने षटकार ठोकून संघाला विक्रमी विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेल याने १५ चेंडूत नाबाद ३२ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व चार चौकार मारले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद ७४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने ४७.३ षटकात पाच बाद ३५६ धावसंख्या उभारत एक नवा विक्रम रचला.
इंग्लंडचा धावांचा डोंगर
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५१ धावांचा डोंगर उभारला. अपेक्षेप्रमाणे लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम वरील फलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीचा फायदा घेत बेन डकेटने १६५ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्याशिवाय जो रूटनेही ६८ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय खूप चांगला ठरला. कारण बेन द्वारशुइसने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना ६ षटकांच्या आत बाद केले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज विकेट करिता आसुसलेले दिसले. बेन डकेट आणि जो रूट यांच्यात १५८ धावांची मोठी भागीदारी झाली. कर्णधार जोस बटलरनेही २३ धावा केल्या.
इंग्लंडचा सर्वोच्च धावसंख्या
इंग्लंड हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या ३२० धावांची होती, जी न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध केली. शेवटच्या ५ षटकांत इंग्लंड संघाला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि सतत विकेट गमावाव्या लागल्या. पण शेवटच्या षटकांमध्ये, जोफ्रा आर्चरच्या १० चेंडूत २१ धावांच्या छोटीशी खेळीमुळे इंग्लिश संघाला ३५० चा टप्पा ओलांडता आला.
सात गोलंदाजांचा वापर
इंग्लंडची दमदार फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला ७ गोलंदाजांचा वापर करावा लागला. बेन द्वारशुइस संघाचा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला, त्याने १० षटकांत ६६ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. अॅडम झांपा आणि मार्नस लाबुशेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर ग्लेन मॅक्सवेलनेही एक विकेट घेतली. नॅथन एलिस वगळता, सर्व ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ६ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.