
बंगळुरू : चिनेल हेन्रीच्या ६२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर यूपी वॉरियर्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ३३ धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीग स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. या स्पर्धेतील यूपी संघाचा हा पहिला विजय आहे.
यूपी वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १७७ अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यात चिनेल हेन्री हिने सर्वाधिक ६२ धावांची खेळी निर्णायक ठरली. चिनेल हेन्री हिने अवघ्या २३ चेंडूत ६२ धावांची वादळी खेळी साकारली. तिने आठ उत्तुंग षटकार व दोन चौकार ठोकले हे विशेष. किरण नवगिरे (१७), ताहलिया मॅकग्रा (२४), दीप्ती शर्मा (१३), श्वेता सेहरावत (११), सोफी एक्लेस्टोन (१२) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला. जोनासेन हिने ३१ धावांत चार विकेट घेतल्या. मॅरिझॅन कॅप (१-१८), अरुंधती रेड्डी (२-५२) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयासाठी १७८ धावांची गरज होती. परंतु, दिल्ली संघ १९.३ षटकात १४४ धावांत सर्वबाद झाला. जेमिमा रॉड्रिग्ज हिने सर्वाधिक ५६ धावा फटकावल्या. तिने एक षटकार व आठ चौकार मारले. शेफाली वर्मा (२४), निकी प्रसाद (१८), शिखा पांडे (नाबाद १२) यांचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजास धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. क्रांती गौड हिने २५ धावांत चार विकेट घेत संघाचा विजय सुकर बनवला. ग्रेस हॅरिस हिने १४ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.