
लिजंड्स प्रीमियर लीग : अष्टपैलू रोहन शाह सामनावीर, सतीश भुजंगेचे आक्रमक अर्धशतक

छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रोहन रॉयल्स संघाने साई श्रद्धा संघावर सात गडी राखून दणदणीत विजय नोंदवत आपली आगेकूच कायम ठेवली. रोहन शाह याने अष्टपैलू कामगिरी बजावत सामनावीर किताब संपादन केला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. साई श्रद्धा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १५१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत रोहन रॉयल्स संघाने १६.५ षटकात तीन बाद १५६ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला.

या सामन्यात रोहन रॉयल्स संघाच्या सतीश भुजंगे याने अवघ्या ४४ चेंडूत ७८ धावांची धमाकेदार खेळी करत मैदान गाजवले. सतीश याने आक्रमक फलंदाजीत सहा टोलेजंग षटकार व सात चौकार ठोकले. इम्रान अली खान याने ३५ चेंडूत ५० धावांची चमकदार खेळी केली. इम्रान याने सहा चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. निखिल मुरुमकर याने २५ चेंडूत ३२ धावांची आक्रमक खेळी साकारली. निखिल याने तीन उत्कृष्ट षटकार ठोकले.
गोलंदाजीत रोहन शाह याने अप्रतिम स्पेल टाकत २२ धावांत पाच विकेट घेत संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. फलंदाजी करताना रोहन शाह याने उपयुक्त २६ धावांची खेळी केली. या अष्टपैलू कामगिरीने रोहन सामनावीर ठरला. विनोद यादव याने २० धावांत एक आणि इम्रान खान याने १८ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : साई श्रद्धा : २० षटकात आठ बाद १५१ (अमित पाठक १७, आकाश अभंग १९, निखिल मुरुमकर ३२, इम्रान अली खान ५०, निखिल कदम ११, सुनील पल्लोड ९, इतर ११, रोहन शाह ५-२२, गुड्डू नेहरी १-१९, डॉ मयूर जंगाळे १-१८, विनोद यादव १-२०) पराभूत विरुद्ध रोहन रॉयल्स : १६.५ षटकात तीन बाद १५६ (सतीश भुजंगे ७८, मिलिंद पाटील १९, रोहन शाह नाबाद २६, सम्राट गुटे ११, डॉ मयूर जंगाळे नाबाद ७, इतर १५, इम्रान अली खान १-१८, डॉ कपिल पल्लोड १-१६, विश्व शिनगारे १-१०). सामनावीर : रोहन शाह .