
न्यू एरा संघ तीन धावांनी पराभूत; इंद्रजीत उढाण सामनावीर

छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात राउडी सुपर किंग्ज संघाने न्यू एरा संघाचा ३ धावांनी पराभव करत रोमहर्षक विजय साकारला. २९ धावांत चार विकेट घेणारा इंद्रजीत उढाण सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. राउडी सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धमाकेदार फलंदाजी करत २० षटकात राउडी सुपर किंग्ज संघाने आठ बाद २०० अशी भक्कम धावसंख्या उभारली. इंद्रजीत उढाण (२) लवकर बाद झाला. त्यानंतर अतुल वालेकर व इनायत अली या अनुभवी फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत ५२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अतुल वालेकर याने केवळ २२ चेंडूत ४३ धावा फटकावल्या. अतुलने दोन षटकार व पाच चौकार मारले. इनायत अली याने २० चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने तीन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले.
मयूर चौधीर याने अवघ्या ३५ चेंडूत ५२ धावांची स्फोटक अर्धशतक खेळी केली. मयूर याने सात चौकार व एक षटकार मारला. सनी ८ धावांवर बाद झाला. भूषण घोळवे याने १८ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी करत डावाला आकार दिला. भूषण याने दोन षटकार व चार चौकार ठोकले. त्यानंतर मनीष करवा (१), आलोक खांबेकर (६), विराज चितळे (नाबाद ५) यांनी आपले योगदान दिले.
न्यू एरा संघाकडून ओंकार सुर्वे याने २२ धावांत दोन गडी बाद केले. मोहम्मद इम्रान (१-३१), नामदेव रेड्डी (१-१५), अतिक नाईकवाडे (१-१८), संदीप जाधव (१-२६), अजिंक्य पाथ्रीकर (१-२३) यांनी प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळवले.
न्यू एरा संघासमोर विजयासाठी २०१ धावांचे मोठे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यू एरा संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. स्वप्नील खडसे केवळ ७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर प्रदीप जगदाळे याने २१ चेंडूत ३४ धावांची आक्रमक खेळी करत डाव सावरला. त्याने तीन षटकार व तीन चौकार मारले. इनायत अली याने प्रदीपला बाद करुन मोठा अडसर दूर केला.
त्यानंतर कर्णधार सारंग सराफ (२६), रिझवान अहमद (३७) यांनी आक्रमक फलंदाजी केली. परंतु, ही जोडी बाद झाल्यानंतर संघ पुन्हा दबावात आला. मोहम्मद इम्रान याने धमाकेदार फलंदाजी करत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. त्याने दोन षटकार व पाच चौकारांसह ४२ धावा काढल्या. तो बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र बदलले. ओंकार सुर्वे याने २२ धावा काढल्या. ऐन मोक्याच्या क्षणी तो धावबाद झाला. त्यानंतर नामदेव रेड्डी (६), अतिक नाईकवाडे (०), अजिंक्य पाथ्रीकर (नाबाद ०), संदीप जाधव (०), नितीन कडवेकर (नाबाद ०) यांना फार योगदान न देता आल्यामुळे न्यू एरा संघाला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यू एरा संघाने २० षटकात नऊ बाद १९७ धावा काढल्या.
राउडी सुपर किंग्ज संघाकडून इंद्रजीत उढाण याने २९ धावांत चार विकेट घेत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आशिष गवळी (१-४७), अलोक खांबेकर (१-३३), इनायत अली (१-२३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.