
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत जालना संघाने धमाकेदार फलंदाजी करत ६६.२ षटकात सर्वबाद ३१४ धावसंख्या उभारली आहे. सचिन सापा आणि मेघ वडजे () यांनी बहारदार अर्धशतके ठोकली. धाराशिव संघाने १९ षटकांच्या खेळात तीन बाद ७५ धावा काढल्या आहेत.
बिडकीन येथे जालना आणि धाराशिव यांच्यात लीग सामना होत आहे. जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ६६.२ षटकात सर्वबाद ३१४ धावा उभारल्या. त्यात सचिन सापा याने १६६ चेंडूत ९६ धावांची बहारदार खेळी केली. त्याचे शतक केवळ चार धावांनी हुकले. सचिन याने एक षटकार व १६ चौकार मारले. मेघ वडजे याने अवघ्या ५६ चेंडूत ७५ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने सहा उत्तुंग षटकार व नऊ चौकार ठोकले. अफताफ शेख याने ४० धावांचे योगदान दिले. त्याने एक षटकार व पाच चौकार मारले.

प्रज्ज्वल राय (१७), आर्यन गोजे (१६), वेदांत देव्हाडे (२९), लक्ष बाबर (९), व्यंकटेश काणे (०), रामेश्वर दौड (५), ओमकार पातकळ (०), शोएब सय्यद (नाबाद २) यांनी आपले योगदान दिले.
धाराशिव संघाकडून सिद्धांत जाधव याने ७० धावांत सात विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समर्थ गव्हाणे याने २९ धावांत दोन बळी घेतले. साबीर शेख याने ६२ धावांत एक गडी बाद केला.
धाराशिव संघाने पहिल्या दिवसअखेर १९ षटकात तीन बाद ७५ धावा काढल्या आहेत. ध्रुव ठक्कर (१८), समर्थ गव्हाणे (८), सन्यम जैन (६) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अतिश राठोड १७ तर प्रथमेश पाटील २१ धावांवर खेळत आहेत.
जालना संघाकडून ओमकार पातकळ याने ३२ धावांत दोन गडी बाद केले. रामेश्वर दौड याने ३७ धावांत एक बळी घेतला. जालना संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.