
जळगाव : पुणे येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे १ ते ७ मार्च दरम्यान खेलो इंडिया मार्फत हॉकी महाराष्ट्र आयोजित सब ज्युनियर व ज्युनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेसाठी हॉकी जळगावतर्फे जळगाव जिल्हा निवड चाचणी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत सब ज्युनिअर गटात २२ मुलींची तर ज्युनियर गटात २३ मुलींची निवड करण्यात आली आहे.
या निवडलेल्या मुलींचे प्रशिक्षण शिबिर जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी अंतिम निवड यादी घोषित करण्यात येणार असल्याचे हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख व हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा अनिता कोल्हे यांनी सांगितले.
निवड चाचणीसाठी विद्या फाउंडेशन जळगाव, डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव व भुसावळ येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथील मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
हॉकी जळगावतर्फे राष्ट्रीय खेळाडू आणि एनआयएस मार्गदर्शक हिमाली बोरोले, वर्षा सोनवणे व इम्रान बिस्मिल्ला यांनी निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. ही समिती अंतिम संघाची निवड करणार आहेत.