कोहली पुन्हा ‘किंग’, भारत उपांत्य फेरीत

  • By admin
  • February 23, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

गतविजेता पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर

श्रेयस अय्यर, शुभमन गिल, कुलदीप यादवचीची दमदार कामगिरी

दुबई : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (नाबाद १००) याने अविस्मरणीय शतक ठोकत गतविजेत्या पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर काढले. कोहलीच्या दमदार शतकाने भारताने सहा विकेट राखून सामना जिंकला. सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

उपांत्य फेरी गाठण्याच्यादृष्टीने भारतीय संघाला विजयासाठी २४२ धावांची आवश्यकता होती. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या सलामी जोडीने ३१ धावांची सलामी दिली. रोहित शर्मा याने १५ चेंडूत २० धावा फटकावल्या. त्यात त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. शाहीन आफ्रिदी याने रोहितला क्लीन बोल्ड करुन भारताला पहिला धक्का दिला. 

बांगलादेश संघाविरुद्ध दमदार शतक ठोकणारा शुभमन गिल आणि अनुभवी विराट कोहली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ही वेगवान व फिरकी गोलंदाजांचा चांगला समाचार घेत होती. भारतीय संघ भक्कम परिस्थितीकडे वाटचाल करत असताना अबरार अहमद याने एका अप्रतिम चेंडूवर शुभमन गिल याला क्लीन बोल्ड बाद करुन मोठा धक्का दिला. शुभमन गिलचे अर्धशतक केवळ ४ धावांनी हुकले. गिल याने ५२ चेंडूत सात खणखणीत चौकार मारले. 

अनुभवी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन विजय सुकर बनवला. या दमदार भागीदारीमुळे गतविजेता पाकिस्तान संघ हतबल दिसून आला. एकही गोलंदाज या जोडीवर कोणताही प्रभाव टाकू शकला नाही. विराट कोहली व श्रेयस अय्यर या दोघांनीही अर्धशतके ठोकत पाकिस्तान संघाचा पराभव निश्चित केला. ३९व्या षटकात श्रेयस अय्यरची ५६ धावांची आक्रमक खेळी संपुष्टात आली. अय्यरने ६७ चेंडूत पाच चौकार व एक उत्तुंगषटकार मारला. अय्यर व कोहली जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. अय्यर बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी २८ धावांची गरज होती. हार्दिक पंड्या ८ धावांवर बाद झाला. 

विराट कोहलीच्या १४ हजार धावा पूर्ण 

या सामन्यात विराट कोहली याने १४ हजार धावांचा टप्पा पार करुन एक नवा माईलस्टोन गाठला आहे. एकदिवसीय सामन्यांत सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांच्यानंतर सर्वाधिक धावा काढणारा विराट कोहली हा तिसरा फलंदाज ठरला आहे. गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली याने फॉर्म गवसण्यासाठी पाकिस्तान संघ निवडला. विराट कोहलीने अनेकदा पाकिस्तान संघाविरुद्ध धमाकेदार कामगिरी बजावलेली आहे. हा सामना देखील याला अपवाद राहिला नाही. कोहलीने १११ चेंडूंचा सामना करत १०० धावा फटकावत संघाला मोठा विजय मिळवून दिला. विराटने सात चौकार मारले. या सामन्यात विराटने काही विक्रमांना देखील गवसणी घातली. कोहलीची ही खेळी पाकिस्तान संघ आणि पाकिस्तान चाहते कधीही विसरू शकणार नाहीत. विराट कोहली आपल्या जुन्या चिरपरिचीत खेळला आणि सर्वांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली. 

भारतीय संघाने ४२.३ षटकात चार बाद २४४ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला. सलग दोन विजय साकारत भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. अक्षर पटेल याने नाबाद ३ धावा काढल्या. शाहीन आफ्रिदी (२-७४), अबरार अहमद (१-२८) व सलमान आगा (१-४३) यांनी विकेट घेतल्या. 

पाकिस्तानची संथ फलंदाजी 

भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २४१ धावा केल्या. सौद शकीलच्या अर्धशतकानंतर पाकिस्तान संघ २५० धावांचा टप्पा गाठू शकला नाही, तरीही पाकिस्तान संघ पुन्हा एकदा संथ फलंदाजीचा बळी ठरला. पाकिस्तानी संघाने या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध आधीच गमावला आहे.

दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय निरुपयोगी ठरला. बाबर आझमने चांगली सुरुवात केली पण २३ धावा करून तो बाद झाला. इमाम उल हकही फक्त १० धावा करून बाद झाला. ४७ धावांत २ विकेट गमावल्यानंतर, मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मिळून पाकिस्तानसाठी १०४ धावा जोडल्या. शकीलने ६२ धावांची महत्त्वाची खेळी खेळली.

कर्णधार मोहम्मद रिझवानमुळे पाकिस्तान संघ अडचणीत
मोहम्मद रिझवानने ४६ धावा केल्या, पण इतक्या धावा करण्यासाठी त्याला ७७ चेंडू लागले. टी २० क्रिकेटच्या या युगात रिझवानची ५९.७४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी पाकिस्तानी संघासाठी ओझे ठरली आहे. याच कारणामुळे भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करू शकला. खुशदिल शाहने पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाची मान वाचवली आणि ३८ धावांची महत्त्वाची खेळी केली.

कुलदीपने कहर केला
भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये कुलदीप यादवने वर्चस्व गाजवले. यादवने ९ षटकांच्या स्पेलमध्ये ४० धावा देत ३ बळी घेतले. त्याने प्रथम फॉर्ममध्ये असलेल्या सलमान आगाची विकेट घेतली, जो फक्त १९ धावा करून बाद झाला. त्याने शाहीन आफ्रिदीलाही गोल्डन डकवर बाद केले आणि कुलदीपने नसीम शाहचा तिसरा बळी घेतला, ज्याने १४ धावा केल्या. त्याच्याशिवाय भारताकडून हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अक्षर पटेल याने दोन फलंदाजांना धावबाद केले तसेच दोन झेल टिपले. शिवाय एक विकेट घेतली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *