
‘पाकिस्तान संघात आमुलाग्र बदल करण्याची वेळ’
दुबई : भारतीय संघाविरुद्ध मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व निवड समितीवर खरमरीत टीका केली आहे. मी अशा पराभवाचा कधीच विचार केला नव्हता असे अक्रम म्हणाला. पराभवाची आम्हाला आता सवय झाली आहे असे अक्रमने खोचकपणे सांगितले.
भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा ६ विकेट्सने पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजय मिळवला. विराट कोहली याने नाबाद शतक ठोकत भारतासाठी चमत्कार केला. विराट कोहलीला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. भारताने २४२ धावांचे लक्ष्य ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. पाकिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २४१ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, भारताने ४ विकेट्स गमावल्यानंतर २४४ धावा करून सामना जिंकला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम संतापला आहे.

‘टेन स्पोर्ट्स’शी बोलताना वसीम अक्रम याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवडकर्त्यांना फटकारले आहे. वसीमने कर्णधार मोहम्मद रिझवानवरही टीका केली आहे. रिझवानने सामन्यात खूप वाईट नेतृत्व केल्याचे वसीम अक्रमने मान्य केले आहे. पाकिस्तानच्या पराभवावर वसीम अक्रम म्हणाला की, ‘आम्हाला आता पराभवाची सवय झाली आहे, रिझवानची सामन्यात कर्णधारपदाची कामगिरी खूप खराब राहिली आहे. गेल्या काही काळापासून आम्ही पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पराभूत होत आहोत. आता मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. धाडसी निर्णय घ्यायचा… किती धाडसी निर्णय. आता आपल्याला तरुण खेळाडू, निर्भय खेळाडूंना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आणायचे आहे.’
माजी पाकिस्तानी गोलंदाज अक्रम पुढे म्हणाला की, ‘तुम्हाला संघात पाच ते सहा खेळाडू बदलावे लागले तरी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, तुम्ही पुढील सहा महिने सामने गमावू शकता पण तरीही तुम्ही त्या मुलांना पाठिंबा दिला पाहिजे आणि २०२६ च्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाला आतापासूनच तयार केले पाहिजे.’
‘स्विंगचा सुलतान’ अक्रम पुढे म्हणाला, ‘आता पुरे झाले. तुम्ही त्यांना स्टार बनवले आहे. तुम्ही त्यांना पुरेशा संधी दिल्या आहेत. गेल्या ५ सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ०.६० च्या सरासरीने फक्त २४ बळी घेतले आहेत. सर्वात निराशाजनक गोष्ट म्हणजे पाकिस्तानची गोलंदाजी सरासरी ही जागतिक क्रिकेटमधील १४ संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट गोलंदाजी कामगिरी आहे. यापेक्षा वाईट काय असू शकते? ओमान आणि अमेरिकेचाही यात समावेश आहे.’
माजी महान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम पुढे म्हणाला, ‘आता पाकिस्तान बोर्डाने प्रथम निवड कर्त्यांना, कर्णधार आणि प्रशिक्षकांना बोलावून विचारावे की त्यांनी संघ कसा निवडला आहे. ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना माहित होते की संघ चांगला नाही. संघाच्या अंतिम घोषणेच्या वेळी त्यांची एक तासाची बैठक झाली होती, परंतु तरीही संघात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. कर्णधार देखील यात दोषी आहे… कारण तो संघाचा नेता आहे. त्याला स्वतःच्या संघात कोणता सामना जिंकणारा खेळाडू हवा आहे हे देखील माहित नाही, म्हणून ही एक विचित्र गोष्ट आहे. तुम्हाला सामन्याची परिस्थिती वाचता येत नाही. हे आणखी लज्जास्पद आहे. पाकिस्तान गोलंदाजी करत असताना, पाकिस्तानी चाहते १५ ते २० षटकांनंतर स्टेडियम सोडून गेले होते हे पाहून खूप निराशा झाली. मी पाकिस्तानच्या इतिहासात असे कधीही पाहिले नाही. हे पाकिस्तान क्रिकेटसाठी दुर्दैवी आहे. पाकिस्तानमध्ये क्रिकेटची आवड आहे आणि असा खेळ पाहणे हृदयद्रावक आहे.’