
सलामीवीर भूमिकेत सर्वात जलद ९ हजार धावा करणारा फलंदाज बनला
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक खास कामगिरी केली आहे. रोहित हा सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ९००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिली धाव घेताच रोहितने ही कामगिरी केली. ही कामगिरी करणारा रोहित हा सहावा सलामीवीर आहे.
रोहितच्या आधी, माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर (१५३१० धावा), श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (१२७४०), वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल (१०१७९), माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट (९२००) आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (९१४६) यांचा या एलिट यादीत समावेश आहे.
रोहितने हे यश मिळवले असले तरी, त्याला या सामन्यात जास्त धावा करता आल्या नाहीत. भारताला पहिला धक्का पाचव्या षटकात ३१ धावांवर असताना बसला. शाहीन आफ्रिदीने पुन्हा एकदा रोहितला फुलर लेन्थ बॉलने क्लीन बोल्ड केले. २०२१ च्या टी २० विश्वचषकात शाहीनने रोहितला ज्या चेंडूवर बाद केले होते तोच चेंडू होता.
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
रोहितने सर्वात जलद गतीने सलामीवीर म्हणून ९००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. या स्थानावर खेळताना त्याने फक्त १८१ डावांमध्ये हे केले. या बाबतीत रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने सलामीवीर म्हणून सर्वात जलद ९००० एकदिवसीय धावांचा विक्रम केला होता. सचिनने १९७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. याआधी, बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहितने ११००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. रोहितने २६१ डावांमध्ये हा विक्रम केला. तो एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज होता. त्याच्या पुढे विराट कोहली आहे. कोहलीने २२२ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
२०२३ मध्ये रोहितने आशिया कप दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर म्हणून ८००० धावा आणि एकदिवसीय सामन्यात १०००० धावा पूर्ण केल्या. रोहित सलामीवीर म्हणून सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला याला मागे टाकले होते. रोहितने हा विक्रम करण्यासाठी १६० डाव घेतले, तर आमलाने १७६ एकदिवसीय डावांमध्ये हे काम केले.
सर्व फॉरमॅट्स एकत्र करून, रोहितने सलामीवीर म्हणून १५००० हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित सातवा फलंदाज आहे. रोहितने सलामीवीर म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये ४४ शतके झळकावली आहेत आणि या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहेत. सलामीवीर म्हणून वॉर्नरने सर्व फॉरमॅटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत, तर सचिनने ४५ शतके झळकावली आहेत.