
‘आमची मोहीम जवळपास संपुष्टात, अजूनही आशा आहे’
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आमची मोहीम आता जवळपास संपुष्टात आली आहे. इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. पण ही परिस्थिती चांगली नाही अशा शब्दांत पराभवाचे वर्णन करत कर्णधार मोहम्मद रिझवान याने विराट कोहलीच्या दमदार शतकाचे कौतुक केले.
विराट कोहली याने एकदिवसीय सामन्यातील ५१ वे शतक साजरे केले. कोहलीचे हे पाकिस्तान संघाविरुद्ध चौथे शतक आहे. मोहम्मद रिझवान याने भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय विराट कोहलीला दिले. रिझवान म्हणाला की, ‘विराटची मेहनत पाहून मी थक्क झालो आहे. संपूर्ण जग म्हणत होते की तो फॉर्ममध्ये नाहीये. पण त्याने इतक्या मोठ्या सामन्यात इतक्या आरामात धावा काढल्या. त्याची तंदुरुस्ती आणि शिस्त कौतुकास्पद आहे. आम्ही त्याला बाद करण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही.’
भारताविरुद्धचा सहा विकेटने पराभव हा पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे. भारताने अ गटातून उपांत्य फेरी गाठली आहे आणि न्यूझीलंडचा प्रवेश निश्चित दिसत आहे. पाकिस्तानला आपला शेवटचा लीग सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रिझवान म्हणाला, ‘आम्ही असे म्हणू शकतो की आमची मोहीम जवळजवळ संपली आहे. आम्हाला इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. एक सामना शिल्लक आहे, त्यामुळे अजूनही आशा आहे. एक कर्णधार म्हणून मला अशा परिस्थिती आवडत नाहीत. आपले नशीब आपल्याच हातात असायला हवे होते. रिझवान म्हणाला,“या निकालाने आम्ही निराश झालो आहोत. आम्ही सर्व विभागांमध्ये चुका केल्या आणि मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकलो नाही. २०१७ मध्ये पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.