परभणी, पिंपरी चिंचवडचा बाद फेरीत प्रवेश; ठाणे ग्रामीणच्या आशा कायम

  • By admin
  • February 24, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

राज्य किशोर-किशोरी कबड्डी स्पर्धा

मनमाड : परभणी आणि पिंपरी चिंचवड यांनी आपल्या दमदार खेळाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या आयोजनाखाली माणकचंद ललवाणी इस्टेट (हेलिपॅड) मैदानावर सुरु असलेल्या ३५व्या किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत त्यांनी साखळीतील सलग दोन विजय मिळवले.

ड गटातील सामन्यात परभणीने रत्नागिरीचा ४७-२२ असा सहज पराभव केला. पहिल्या डावात २५-१० अशी आघाडी घेतलेल्या परभणीने शेवटपर्यंत आक्रमक खेळ कायम ठेवला. यशश्री इंगोले आणि शिवकन्या वाघ यांनी अप्रतिम खेळ दाखवला. रत्नागिरी संघाकडून वैशाली जाधवने एकाकी झुंज दिली.

इ गटात पिंपरी चिंचवडने कोल्हापूरचा ४६-३५ असा पराभव करत आपली बाद फेरीतील वाटचाल सुनिश्चित केली. संतोषी थोरात आणि सिद्धी लांडे यांनी पिंपरी चिंचवडसाठी चमकदार कामगिरी केली, तर कोल्हापूरकडून समृद्धी मुंगुरकर आणि दिव्या डांगे यांनी चांगला खेळ केला.

ठाणे ग्रामीण संघाने बीडवर ६७-२५ असा दणदणीत विजय मिळवत बाद फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. सकाळच्या सत्रात परभणीकडून पराभूत झाल्याने या सामन्यात ठाण्यासाठी विजय अत्यावश्यक होता. संस्कृती माळवे आणि नीती गायकर यांच्या तुफानी चढायांना योगिनी म्हात्रे हिच्या पकडीची सुरेख साथ मिळाली आणि ठाण्याने मोठा विजय मिळवला. बीडच्या उमा पवारने चांगली झुंज दिली.

उद्घाटन सामन्यात मुंबई उपनगर पूर्वचा जलवा
स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात मुंबई उपनगर पूर्वने गतविजेत्या जालनाचा ५४-४३ असा पराभव करून साखळीतील पहिला विजय मिळवला. सेरेना म्हसकर आणि आस्था सिंग यांच्या झंझावाती चढायांनी आणि तनश्री शिंदे व आर्या दिनेश यांच्या पकडीच्या खेळाने मुंबईने गुणांचे अर्धशतक पार केले. जालनाकडून वैष्णवी शेवत्रे, कल्याणी शिंदे आणि नंदा नागवे यांनी दुसऱ्या डावात चांगली झुंज दिली.

यजमान नाशिक शहर संघाने नाशिक ग्रामीणला ४५-२८ अशा फरकाने पराभूत केले. विदिशा लोणार आणि स्नेहा पवार यांच्या आक्रमक खेळाने नाशिक शहर संघाला विजय मिळवून दिला. ठाणे शहर संघाने जळगाववर ४७-२१ असा सहज विजय मिळवला, तर अहमदनगरने मुंबई शहर पश्चिमवर ५९-४२ असा निर्णायक विजय मिळवला.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुहास कांदे आणि अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील फेऱ्यांत आता अधिक रोमांचक सामने रंगणार असून कोणता संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संक्षिप्त निकाल : धाराशिव विजयी विरुद्ध छत्रपती संभाजीनगर (४२-४१), मुंबई उपनगर पश्चिम विजयी विरुद्ध हिंगोली (५९-२६), नाशिक शहर विजयी विरुद्ध धाराशिव (६३-१२), जळगाव विजयी विरुद्ध हिंगोली (५१-४३).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *