
कला, क्रीडा आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल स्थानी
मुंबई : राजभवन आयोजित २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर उमटली आहे. मुंबई विद्यापीठाने क्रीडा महोत्सवात ४३० गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.
पुरुष गटात २०० गुण आणि महिला गटात २३० गुण मिळवून मुंबई विद्यापीठाने हा बहुमान मिळवला आहे. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई विद्यापीठाच्या संघानी विविध क्रीडा प्रकारात अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खोखो मुली, टेबल टेनिस मुली, बॅडमिंटन मुले, कबड्डी मुली, बुद्धिबळ मुले या संघानी प्रथम क्रमांक मिळवला आहे. कबड्डी मुले, बुद्धिबळ मुली, बास्केटबॉल मुले, ॲथलेटिक्स मुली, ॲथलेटिक्स मुले द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर व्हॉलीबॉल मुली, बास्केटबॉल मुली, खोखो मुले यांनी तृतीय क्रमांक मिळवून जवळपास सर्व क्रीडाप्रकारात मुंबई विद्यापीठाने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठास ५ सुवर्ण ६ रौप्य आणि ३ कांस्य पदक मिळाले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूनी विविध खेळ प्रकारात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ अजय भामरे, कुलसचिव डॉ प्रसाद कारंडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा मार्गदर्शक आणि संघ व्यवस्थापकानी केलेल्या कामगिरीचेही विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या सांस्कृतिक युवा महोत्सव आणि आविष्कार संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्या पाठोपाठ २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने विजेतेपद पटकावून कला, क्रीडा आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल स्थानी पोहचले आहे.